इव्हीएम गोंधळ भोवला, भंडारा-गोंदियामध्ये होणार फेरमतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये झालेल्या गोंधळामुळे भंडारा-गोंदियामध्ये फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. एकूण ४९ ठिकाणी उद्या (३० मे) हे फेरमतदान होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान झाले होते.

इव्हीएम व व्हीव्हीपॅटचा गोंधळ

भंडारा-गोंदियामध्ये मतदानाच्या दिवशी इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या तक्रारींमुळे गोंधळ उडाला होता. अनेक ठिकाणी इव्हीएम बंद असल्याने मतदार माघारी फिरले होते. पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल ४५० इव्हीएम मशीन्स बंद पडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारीपदासह जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी अभिमन्यू काळे हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात होते.

का झाली पोटनिवडणूक?

भंडारा-गोंदियामध्ये नाना पटोले हे भाजपकडून खासदार म्हणून निवडणून आले होते. परंतू पक्षासोबत झालेल्या वादानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.