
<<जयंत आंबेरकर>>
एकेकाळी देवगडचा हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध होता. अल्फान्सो म्हणून त्याचा गौरव होता. पण आज देवगडचा हापूस आंबा पाहण्यासाठी देवगडातच कुठेतरी उभारलेल्या वॅक्स म्युझियममध्ये जाऊन शोधण्याची वेळ आली आहे. विदर्भातील शेतकरी कर्जासाठी आत्महत्या करीत असताना कोकणच्या शेतकऱ्याने मात्र हापूस कलमांची हालत भाकड गाईप्रमाणे करून स्वतःच्याच संसाराची स्थिती भाकड गाईप्रमाणे करून घेतली आहे.
हे असे का घडले असावे? वीस-पंचवीस वर्षांपूर्वी कुणा एका ऍग्रो कंपनीने झाडांना दुपटीपेक्षा जास्त फळे लागावीत असे एक केमिकल बाजारात आणले. हे द्रावण झाडाच्या मुळाशी बादलीभर पाण्यात मिसळून टाकायचे आणि फलधारणा होण्याची वाट पाहायची. खरोखरच कंपनीचा दावा खरा ठरला आणि हापूसच्या झाडावर पाचाच्या जागी पंचवीस आंब्यांचा घड लटकू लागला. कोकणच्या शेतकऱ्यांनी आंबा हंगामापुरत्या बागा दलालांना दिल्याकारणाने जास्तीत जास्त फायदा, नफा कमाविण्यासाठी दलाल लोकांनी हापूसच्या मुळाशी कल्टारचा मारा सुरू केला आणि ते ट्रक भरून पैसे कमावू लागले. काय घडत आहे हे शेतकऱ्यांना समजण्यापूर्वीच पुढल्या हंगामात कोकणचा हापूस बागायतदार स्वतःहून कलमांच्या मुळात कल्टार टाकू लागला आणि जास्तीत जास्त फळांची उत्पत्ती घडवून भरपूर पैसा कमावू लागला होता.
पण त्याच वेळी दुसऱ्या एका कंपनीने कल्टार हे कसे हानीकारक आहे, त्यामुळे झाडांची स्थिती भाकड गाईसारखी होईल. तेव्हा कल्टारसारखे विष घालून झाडांना वांझ करू नका. कृषी विद्यालय व काही जागरुक कृषी वैज्ञानिकांनीही कल्टारच्या विरोधात आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण पैशाच्या मोहापायी दलाल आणि कोकणच्या शेतकऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले.
आज कल्टार या रसायनाने लाखो हापूसच्या झाडांना कल्टार-करठार करून टाकले आहे. हजारो झाडांतून एखाद्या झाडावर पाचपंचवीस आंबे मिळत आहेत. देवगडचा हापूस कापला की आतमध्ये सफेद निघतो किंवा धाग्यासारख्या शिरा निघतात. ज्या परप्रांतीयांनी हापूससाठी जीव लावला, हजारो रुपयांनी डझनाचा सौदा केला तेच लोक आता देवगडच्या आंब्याला नावे ठेवू लागले आहेत. देवगडच्या हापूसकडे पाठ फिरवू लागले आहेत.
डझनभर पोरे असलेले आई-बाप जसे सर्वच पोरांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामतः शेवटची पिलावळ कुपोषित होते अगदी त्याचप्रमाणे कल्टारपासून उत्पन्न झालेले शेवटचे पीक रोगट आणि बेचव झाले आहे. कल्टारमुळेच आपण आपल्याच जननीला वांझोटे आणि भाकड केले हे प्रत्येक शेतकऱ्याला, बागायतदाराला समजले आहे. पण फार वेळ झाला आहे.
कल्टार याचा या दृष्टिकोनातून अर्थ होतो ‘कल ठार’! कल म्हणजे उद्या, ठार म्हणजे मृत्यू. याचाच अर्थ स्लो पॉयझनिंगसारखे कल ठार वापरल्याने हापूस कलमांचा धीरे धीरे मृत्यू अटळ आहे. आज बागा आहेत, बागेत हजारो कलमे आहेत. पण आंबा नाही अशा अवस्थेत उदासपणे या भकास बागांमधून शेतकरी स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त केलेल्या संसाराकडे पाहताना दिसतो आहे. नव्याने झाडे लावावीत तर पुन्हा नवा संसार थाटावा लागणार आहे. नवी झाडे पुढील पाच-दहा वर्षांनी फलोधारणा करतील. पण तोपर्यंत काय? कल्टार टाकून उद्ध्वस्त झाल्यानंतर कोकणचा आंबा बागायतदार आता ‘नो कल्टार’ या भावनेप्रत जरी येऊन ठेपला असला तरी जी काही चांगली फळे मिळत आहेत त्यांना बाजारभाव बाराशे रुपये डझन असला तरी व्यापारी (आडते) पाच डझनांच्या पेटीला दोन हजाराचा भाव देत आहेत. त्यातून हमाली दलाली वगैरे कापून शेतकऱ्याच्या हातात पेटीमागे पंधराशे पडत आहेत. जागेवर काही आंबा खरेदी-विक्रीच्या संस्था आहेत त्या वजनावर हापूस घेऊन तेथेही बागायतदारांची फसवणूक करीत आहेत. अशा स्थितीत एकेकाळी जागतिक कीर्तीवर पोहोचलेला अल्फान्सो हापूस पुन्हा एकदा ‘नो कल्टार’ धोरणानुसार झाडांच्या मुळातील संपूर्ण माती काढून पुनर्भरण करून भरपूर पाणी पावसाळय़ात अडवून मुळांना स्वच्छ सूर्यप्रकाश मिळवून देणे, कोणतीही केमिकल्स वा रसायने न वापरता सेंद्रिय खते, शेणखतासारखी पृष्ठाr देणारी मात्रा दिल्यास पुढच्या वर्षी निश्चितच चांगली फलोधारणा होईल.
तेव्हा कोकणच्या शेतकऱ्यांनो, बा रवळ देवाकडे शपथ घेवा, यापुढे नो कल्टार प्लीज.




























































