
मानवो मङ्गलस्नायी नैव लक्ष्म्या वियुज्यते ।
दीपैर्नीराजनादत्र सैषा दीपावलि स्मृता ।।’
>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]
भारतीय संस्कृतीत दीपाचे महत्त्व केवळ प्रकाश निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही. ज्ञान, विवेक, चैतन्य, मांगल्य, स्थैर्य आणि परोपकार अशा अनेक संकल्पनांचे प्रतीक म्हणून दीपाला प्रतिष्ठा लाभली आहे. संस्कृत साहित्यामध्ये दीपाच्या या विविध अर्थच्छटा अत्यंत सुंदर रीतीने प्रकट झालेल्या दिसतात.
स्कंपुराणातील ‘कार्तिक मास माहात्म्या’त आलेल्या या श्लोकाचा अर्थ असा की, मंगलस्नान करणारा मनुष्य लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहत नाही. याप्रसंगी दिव्यांनी निरांजन केले जाते म्हणून या उत्सवाला ‘दीपावली’ असे म्हटले जाते. दीपावली म्हणजे दीपांची आवली अर्थात दिव्यांची रांग! दीप आणि दीपावली यांचे नाते असे शब्दार्थापासूनच सुरू होते. दिवाळीच्या निमित्ताने घराच्या उंबरठय़ावर, अंगणात, देवघरात, मंदिरात दिवे प्रज्वलित केले जातात. अमावस्येच्या अंधाऱया रात्री असंख्य दीपज्योतींनी अवघा परिसर उजळून निघतो. मात्र भारतीय संस्कृतीत दीपाचे महत्त्व केवळ प्रकाश निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही. ज्ञान, विवेक, चैतन्य, मांगल्य, स्थैर्य आणि परोपकार अशा अनेक संकल्पनांचे प्रतीक म्हणून दीपाला प्रतिष्ठा लाभली आहे. संस्कृत साहित्यामध्ये दीपाच्या या विविध अर्थच्छटा अत्यंत सुंदर रीतीने प्रकट झालेल्या दिसतात.
भारतीय तत्त्वज्ञानात प्रकाश आणि अंधार या संकल्पनांना विशेष अर्थ आहे. उपनिषदातील प्रसिद्ध प्रार्थना आहे –
असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मामृतं गमय ।।
असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे नेण्याची ही प्रार्थना आहे. येथे अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव नव्हे, तर अज्ञानाचे प्रतीक आहे. प्रकाश म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, सत्याची जाणीव आणि आत्मोन्नतीचा मार्ग!
श्रीमदभगवद्गीतेत दीपाच्या माध्यमातून मनाच्या स्थैर्याचे वर्णन केले आहे.
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मन ।।
वारा नसलेल्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत जशी निश्चल राहते, त्याप्रमाणे आत्मध्यानात मग्न झालेल्या योगी पुरुषाचे चित्त स्थिर असते. बाह्य विषयांचे विक्षेप दूर झाले की, मन एकाग्र होते. दीपाच्या एका साध्या उदाहरणातून गीतेने योग साधनेचे गहन तत्त्व उलगडले आहे. अशा प्रकारे दीप हे मानसिक स्थैर्याचेही प्रतीक बनते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेलाच दीपाची उपमा दिली आहे.
प्रदीप सर्वविद्यानामुपाय सर्वकर्मणाम् ।
आश्रय सर्वधर्माणां शश्वदान्वीक्षिकी मता ।।
आन्वीक्षिकी म्हणजे तर्क, अनुमान, चिकित्सा आणि विवेक यांच्या साहाय्याने एखाद्या विषयाचे सखोल परीक्षण करून सत्याचा शोध घेणारी विद्या. कौटिल्याच्या मते ही आन्वीक्षिकी सर्व विद्यांना प्रकाशित करणाऱया दीपाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे अंधारात दिवा लावल्यावर वस्तूंचे स्वरूप स्पष्ट होते, त्याप्रमाणे चिकित्सक विचारांच्या साहाय्याने विविध शास्त्रांतील तत्त्वांचे आकलन होते. येथे दीप हे विवेकबुद्धीचे आणि ज्ञानप्राप्तीचे प्रतीक ठरते. संस्कृत साहित्यात दीपाचे लौकिक महत्त्वही आढळते. दिवाळीचा संबंध रामाच्या स्वागतासाठी सजवलेल्या अयोध्येशी जोडला जातो. वाल्मीकी रामायणातील श्रीरामांच्या नियोजित राज्याभिषेकासाठी अयोध्येत केलेल्या सजावटीचे वर्णन आहे.
प्रकाशकरणार्थं च निशागमनशङ्कया ।
दीपवृक्षांस्तथाचक्रुरथ्यासु सर्वश ।।
आनंदोत्सव उशिरापर्यंत चालणार. तेव्हा रात्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन अयोध्येतील सर्व रस्त्यांवर प्रकाशासाठी दीपवृक्ष उभारण्यात आले. ‘दीपवृक्ष’ हा शब्द किती सुंदर आहे! यावरून प्राचीन भारतातही उत्सवप्रसंगी सार्वजनिक मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिव्यांची व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते. संस्कृत काव्यात दीप वेगवेगळ्या रूपांत अवतरतो. महाकवी कालिदासाच्या ‘रघुवंश’ महाकाव्यात इंदुमतीच्या स्वयंवराचे वर्णन करताना तर दीपशिखेची विलक्षण उपमा आली आहे. इंदुमती एकेका राजाच्या समोरून पुढे जाते. ती आपल्याला वरणार नाही हे लक्षात येताच त्या राजाचे मुख मलिन होते. रात्रीच्या वेळी दीपशिखा पुढे निघून गेल्यावर मागे राहिलेला प्रासाद जसा अंधारमय दिसतो तशी ही कल्पना आहे. या प्रसिद्ध उपमेमुळे कालिदासाला ‘दीपशिखा कालिदास’ असेही संबोधले जाते.
दीपाच्या माध्यमातून सज्जनांच्या परोपकारी वृत्तीचेही सुंदर वर्णन संस्कृत सुभाषितकारांनी केले आहे. अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम् । सदा लोकहिते युक्ता रत्नदीपा इवोत्तमाः ।। सामान्य दीपाला प्रकाश देण्यासाठी तेल, पात्र आणि वात यांची आवश्यकता असते. मात्र स्वतच्या तेजाने प्रकाशमान असलेल्या रत्नदीपाला या गोष्टींची गरज नसते, अशी कवीची कल्पना आहे. कवी म्हणतो की, सज्जनांचेही तसेच असते. समोरच्या व्यक्तीकडून प्रेम मिळेल का, ती मदतीस पात्र आहे का किंवा तिची परिस्थिती कशी आहे, याचा विचार न करता ते लोककल्याणासाठी कार्यरत राहतात. आज विद्युत प्रकाशाने आपले जग उजळून निघाले आहे तरीही देवघरातील नंदादीप, मंदिरातील दीपमाला किंवा संध्याकाळी प्रज्वलित होणारी समई यांचे महत्त्व कमी झालेले नाही. कारण कृत्रिम प्रकाश बाह्य अंधार दूर करतो; तर दीपज्योत आपल्याला अंतकरणातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याची प्रेरणा देते. बाह्य विश्व उजळवणारा दीप आपल्या अंतकरणातही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करो हीच दीपावलीची खरी सार्थकता!
लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)


























































