कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी संकटात, प्रोत्साहन योजना लागू करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लासलगाव

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीस चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना लागू करावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस येत आहे. एकट्य़ा लासलगाव बाजार समितीत दररोज सुमारे १५ ते १७ हजार क्विंटल कांद्याची विक्री होत आहे. त्याला किमान ३००, कमाल ९०१ व सरासरी ७०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, सरासरी बाजारभावाचा विचार करता उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात कांद्याचे उत्पादन वाढले आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन मोठय़ा प्रमाणावर कांदा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पुढे भाव आणखी घसरण्याची शक्यता पाहता निर्यातीवर भर देणे गरजेचे झाले आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील विदेश व्यापार महानिदेशालयाने २४ मे २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार देशातून सुकविलेल्या कांद्याची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना ३ ऐवजी ५ टक्के निर्यात प्रोत्साहन योजना लागू केली आहे. याचा फायदा फक्त कांदा सुकविण्याचे प्रकल्प कार्यान्वीत असलेल्या भागातील निर्यातदारांना होणार आहे. महाराष्ट्राला याचा कोणताच फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी त्वरित ताजा कांदा किंवा शीतगृहात साठविलेला कांदा निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनाही ५ टक्के प्रोत्साहन योजना लागू करावी, असे आपले म्हणणे होळकर यांनी मांडले आहे.