
सामना ऑनलाईन । अंबाजोगाई
बीडमधील अंबाजोगाई शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या पाच लोकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. जखमींमध्ये दोन महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भगवान बाबा चौकच्या दरम्यान सकाळी साडे पाच ते साडेसहा दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या मध्यमवयीन कुत्रा चावल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिसाळलेल्या या कुत्र्यासोबतच भटक्या कुत्र्यांचाही नगर परीषद आणि संबंधित विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे. तसेच शहर आणि परिसरातील नवीन वस्त्यांमधून योगेश्वरी महाविद्यालय मैदान, भगवानबाबा चौक, जवळगाव रस्ता, रिंग रोड या परीसरात मॉर्निंग वाँकला येणाऱ्या नागरिकांनीही पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊ नये यासाठी स्वतः हूनच सतर्कता बाळगण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरीक मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

























































