९५ लाखांचा निधी वाया ; मोडकाघर धरणाला गळती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनालाईन । गुहागर

गुहागर शहरसह आजूबाजूच्या अनेक ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे. भीषण दुष्काळ पडला असतानाही या भागात मोडकाघर धरणामुळे टंचाईची तीव्रता कमी जाणवली. या धरणाला मोठय़ा प्रमाणात गळती लागली होती. यासाठी ९५ लाखांचा निधी खर्चूनही ही गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नाही. पावसाळय़ात पाणीसाठा होणे गरजेचे असताना या गळतीमुळे भविष्यात मोडकाघर धरणातला पाणीसाठा वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे आजूबाजूच्या भागातील गावांवर पाणीटंचाईची टांगती तलवार राहणार आहे.

गुहागर शहरसह आजूबाजूच्या अनेक ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे. भविष्यात कमी पावसामुळे दुष्काळासारख्या गंभीर संकटापासून हे धरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ११.६५ चौरस किलोमीटर असून उंची तब्बल २० मीटर आहे. या अवाढव्य धरणाची साठवण क्षमता ४४.७० लाख घनमीटर आहे.
कोकणातील वाढत्या शहरीकरणात कालांतराने शेती, भाजीपाला व बागायतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या धरणाच्या मुबलक पाणीसाठय़ावर सुरुवातीला तालुक्याचे ठिकाण असलेल्या गुहागर व शेजारच्या असगोली ग्रामपंचायतीने संबंधित खात्याची पूर्वपरवानगी घेऊन धरणाच्या शेजारी विहीर पाडून त्यावर स्वतंत्र जॅकवेल पंप बसवून नळपाणी योजना सुरू केली. त्यानंतर शेजारच्या पाटपन्हाळे, पालशेत व आरे गावांनीही आपापली पाणी योजना व धरणाच्या बाजूला विहीर बांधली आहे. २०१०-११ मध्ये धरणाच्या भिंतीमधून लागलेली गळती बंद करण्यासाठी राज्य शासनाने जलसुधारणा प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेला ९५ लाखांचा भरीव निधी या ठिकाणी खर्ची टाकला.

प्रत्यक्षात ही गळती बंद करण्यास संबंधित ठेकेदाराला अपयश आले. त्यामुळे दुरुस्तीवर टाकलेला निधी अक्षरशः वाया गेल्याने वर्षाकाठी साठलेल्या पाण्यापैकी लाखो लीटर पाणी आजही या धरणामधून वाया जात समुद्राला मिळत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे शासनाच्या लघु पाटबंधारे खात्याने पाण्याचे सध्याचे महत्त्व लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराकडून ही गळती कोणताही जादा निधी न देता पूर्णतः बंद करून घ्यावी, अशी मागणी गुहागर तालुकावासीयांकडून होत आहे. गेल्या काही वर्षांत कमी झालेला पाऊस लक्षात घेता भविष्यात आपणही पाण्याच्या टंचाईची टांगती तलवार गुहागर आणि आसपासच्या ग्रामस्थांवर आहे.

धरणातील गाळ काढणे आवश्यक
पावसाळय़ात वाहून जाणाऱया पाण्यापासून धरणातील पाणीसाठा व पाण्याची पातळी वाढविण्याकरिता सर्वतोपरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी गेल्या ४५ वर्षांत धरणामध्ये साठलेला गाळ उपसण्याची गरज आहे. या कामासाठी तालुका प्रशासनाच्या पुढाकारासह लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.