
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अपुऱ्या कोरमअभावी गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या नव्या याचिकांवर आता सुनावणी होणार आहेत. राज्य सरकारने आयोगावर माजी ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर आणि माजी न्यायमूर्ती इकबाल मजहर हुसैन बोहरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली असून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगावर अध्यक्षांसह दोन सदस्य होते, मात्र जुन्या याचिकांवरील सुनावण्या प्रलंबित असल्याने त्या निकाली काढण्यासाठी आपण नवीन याचिकांवर सुनावणी घेणार नसल्याचे दीपक लाड आणि आझिझ खान या सदस्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे अपुऱ्या कोरमअभावी अध्यक्षांना सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे तीन महिन्यांपासून नव्याने दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणीच झाली नव्हती. दरम्यान, लाड आणि खान यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपला आहे. त्यामुळेच सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाच्या सदस्यपदी एक माजी न्यायमूर्ती आणि अन्य एका सदस्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आयोगाचा कोरम पूर्ण झाला असून आता नव्याने दाखल होणाऱ्या याचिकांवर सुनावण्या सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
























































