
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील उद्योजकांना फायदा झाला का, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र मात्र ‘डिस्कनेक्ट’ होते. संभाजीनगरसह राज्यभरातील उद्योजकांना थेट संवाद साधता न आल्यामुळे पंतप्रधानांची ‘मन-की-बात’च ऐकावी लागली.
केंद्रात सत्तेवर येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली. या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या अनेक घोषणा केल्या. या घोषणांची कितपत अंमलबजावणी झाली, त्याचा फायदा जनतेला किती झाला, हे विविध माध्यमांतून तपासण्याचे काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यासाठी संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यासाठी कनेक्टीव्हिटी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही.
ज्या – ज्या शहरांसाठी कनेक्टीव्हिटी जाहीर केली होती, तेथे उद्योजक पंतप्रधानांना काही प्रश्न विचारणार होते. आपल्या उत्पादनाविषयी महाराष्ट्रातील नाशिक, संभाजीनगरसह अन्य काही ठिकाणचे उद्योजक सकाळी ९ वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ३३ नवउद्योजक उपस्थित होते. मात्र, त्यांचा हिरमोड झाला. पंतप्रधानांना आपला प्रश्न विचारण्याची, समस्या मांडण्याची संधीच उपलब्ध झाली नाही. ‘स्टार्टअप इंडिया’मध्ये महाराष्ट्र ‘डिस्कनेक्ट’च होता. पंतप्रधानांचा एकतर्फी संवाद सुरू होता. त्यांचीच ‘मन-की-बात’ ऐकणे उपस्थित उद्योजकांना भाग पडले.
महाराष्ट्रासह देशात उद्योगवाढीसाठी ‘स्टार्टअप इंडिया’ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार नवोदित उद्योजकांसाठी सवलतीबरोबरच प्रोत्साहन देण्याचा मूळ उद्देश होता. मात्र, अंमलबजावणीतील त्रुटींमुळे याचा म्हणावा तेवढा फायदा उद्योजकांना होऊ शकलेला नाही, हे सत्य यावेळी समोर आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी नंतर उपस्थित उद्योजकांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कौशल्य विकासचे सहायक संचालक ए. बी. पवार, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप गुरुलवार, सुरेश वराडे, उद्योजक किरण भुसारे, योगेश पवार, वर्षा पाडाळकर यांच्यासह शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































