परभणीत पाच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सोनपेठ

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तलाठी व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुरुवारी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी आत्मदहनचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोनपेठ तालुक्यातील आवलगाव महसूल मंडळातील तब्बल दहा गावात १३ फेब्रुवारी रोजी अचानक गारपीट होऊन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानी संदर्भात प्रशासनाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर शासनाने तब्बल १ कोटी ८४ लक्ष रुपयांचा निधी दिला होता. मात्र संबधित गावांचे तलाठी व महसुलाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून केवळ मर्जीतल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले. असा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला होता.

त्यानंतर शेतकऱ्यांनी तलाठी रमेश लटपटे यांच्यावर कारवाई करावी तसेच अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वाटप करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे ३१ मे रोजी करण्यात आली होती. मात्र महसूल विभागाने आजतागायत कुठलीही कारवाई न केल्यामुळे संबधित गावातील पाच शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.