हिंदुस्थान-केनियामध्ये अंतिम लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,मुंबई
यजमान हिंदुस्थानसमोर हीरो इंटरकॉण्टिनेण्टल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता संघ उभा ठाकणार आहे याचे उत्तर शुक्रवारी मिळाले. केनियाने चीन तैपईचा ४-० अशा फरकाने धुव्वा उडवला आणि फायनलचे तिकीट बुक केले. आता येत्या रविवारी होणाऱया जेतेपदाच्या लढतीत सुनील छेत्रीचा हिंदुस्थानी संघ केनियाला भिडणार आहे.

केनिया व चीन तैपेई यांच्यामधील लढतीत पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी झाली. दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले, पण उत्तरार्धात मात्र केनियाच्या फुटबॉलपटूंनी आक्रमक खेळ करीत चीन तैपईचा बचाव खिळखिळा केला. ओधिंबोने ५२ व्या, ऍटुडोने ५५ व ८८ व्या आणि ओटिएनोने ७० व्या मिनिटाला दमदार गोल करीत केनियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हिंदुस्थानी संघाने साखळी फेरीत दोन विजयांसह सहा गुणांनिशी पहिले स्थान पटकावले. तसेच केनियाने सहा गुणांसह दुसरे व न्यूझीलंडने सहा गुणांनिशीच तिसरे स्थान पटकावले. सरस गोलफरकाच्या जोरावर केनियाने अंतिम फेरीत वाटचाल केली.

संडे धमाका, पुन्हा हाऊसफुल्ल
हिंदुस्थान व केनिया यांच्यामध्ये रविवारी होणाऱया लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या लढतीची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत. त्यामुळे अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरीनाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड पुन्हा एकदा झळकणार आहे. यजमान हिंदुस्थानी संघाला पाठिंबा देण्यासाठी हजारो फुटबॉलप्रेमी स्टेडियमची वाट धरणार आहेत.