तेवीस तोळ्यांचे दागिने पळविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक उपनगर भागात गुरूवारी भरदिवसा चोरट्य़ांनी कारची काच फोडून दीड लाखाच्या रोख रकमेसह २३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने पळविल्याने खळबळ उडाली आहे.

दत्तमंदिर रस्त्यावरील ड्रिम हाऊस कॉम्प्लेक्समध्ये अभय अरुण शहाणे यांचे सराफी दुकान आहे. गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुकानासमोर कार उभी करून ते इमारतीत गेले. अवघ्या काही मिनिटात ते परतले, तोपर्यंत त्यांच्या कारच्या डाव्या बाजूची पुढची काच फोडून चोरटय़ांनी आतील प्लॅस्टिकची पिशवी पळविल्याचे निदर्शनास आले. त्यात दीड लाखांच्या रोख रकमेसह सोन्याची साखळी, तीन अंगठ्य़ा, वेढे, मण्यांची माळ, गंठण, चार हिरे, दोन पुष्कराज रत्ने यांचा समावेश होता. हा ऐवज सुमारे दहा लाख रुपयांचा आहे. या प्रकरणी शहाणे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.