
सामना ऑनलाईन । दुबई
दुबईत अगदी रस्त्यावरही सोन्याचा बाजार भरत असल्याचं तुम्ही वाचलं असेल. पण आता चक्क दुबईतल्या बुर्ज अल अरब या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी सोनं दिलं जात असल्याचं समोर येत आहे. या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या केक, कॉकटेल, कॅपेचिनो आणि इतर अनेक डिशेसमध्ये सोन्याचा वापर केला जातो.
बुर्ज अल अरब हॉटेलची अंतर्गत सजावटीतही सोन्याची पखरण करण्यात आली आहे. हॉटेलच्या आवारात १७९० चौरस मीटरचा २४ कॅरेटचं सोन्याच पान लावण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटच नाव गोल्ड ऑन २७ असून, हे रेस्टॉरंट इमारतीच्या २७व्या मजल्यावर आहे. हॉटेलच्या फूड आणि बेव्हरेजेस विभागाचे मॅनेजर हारो यांनी माहिती देताना सांगितलं की, लक्झरियस लाइफ दाखवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. या प्रयोगामध्ये आम्हाला यश मिळत आहे आणि लोकांचीही पसंती मिळत आहे. आमच्या या प्रयोगामुळे लोकांची गर्दीही वाढत आहे.
गोल्ड ऑन २७मध्ये मिळणाऱ्या डिशेस आणि बेव्हेरेजेसपैकी सगळ्यात लोकप्रिय एलिमेंट-७९ नावाचं कॉकटेल आहे. या अल्कोहोलफ्री कॉकटेलमध्ये वाइनसोबत गोल्ड फ्लेक्स असतात. या कॉकटेलमध्ये मिसळले जाणारे साखरेचे खडेही सोनेरी रंगाचे असतात. हारो यांच्या सांगण्यानुसार दर महिन्याला एक-दोन पाहुणे सोन्याचा वर्ख असलेला केक ऑर्डर करतात. हॉटेलच्या फूड आणि बेव्हरेजेसमध्ये दरवर्षी ७०० ग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचा वापर केला जातो. इथे सुरू असेलेल्या या सोन्याच्या खादाडीमुळे हे हॉटेल सध्या खूप चर्चेत आहे.































































