
सामना प्रतिनिधी । नांदेड
आपल्या कुटुंबासह धोंडे खाण्यासाठी नांदेडला आलेल्या एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त नियंत्रक सत्यकुमार नारायण दरबसवार रा. परतूर जि. जालना यांचा शनिवारी कौठा शिवारातील गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
सिडको येथील सासरवाडीत दरबसवार कुटुंबिय हे धोंडे खाण्यासाठी आले होते. त्यापूर्वी सत्यकुमार नारायण दरबसवार (६०) हे पवित्र गोदावरी नदीत आंघोळ करण्यासाठी गेले. कौठा शिवारात ते आंघोळ करत असताना नदीत उतरले. मात्र खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने कौठा शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात ते बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचे प्रेत नंतर पाण्यातून बाहेर काढले. कपड्याजवळ असलेल्या मोबाईलवरुन त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार ज्ञानोबा केंद्रे यांनी माहिती समजताच घटनास्थळ गाठून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह आज नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.




























































