संजू सॅमसन, मोहम्मद शमी यो-यो चाचणीत फेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रिडा प्रतिनिधी । मुंबई

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामधून जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला तर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या हिंदुस्थान ‘अ’ संघातून संजू सॅमसनला बाहेर काढण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे.

हिंदुस्थानी संघातील खेळाडूंच्या शारीरिक फिटनेसचे मानक असलेल्या यो – यो चाचणीत या दोन खेळाडूंना अपयश आले आहे. शमीच्या जागी नवदीप सैनीला तर संजूऐवजी १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार ईशान किशनला पसंती दिली आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ‘अ’ संघ रविवारी रात्री दिल्ली विमानतळावरून लंडनला रवाना झाला, मात्र या संघात संजूचा समावेश नव्हता. हिंदुस्थानी संघासाठी खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या या नव्या यो–यो चाचणीत पात्र होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या १६.१ गुण मिळवण्यात संजू अपयशी ठरला. संजूच्या गुणांबाबत निश्चित माहिती नसली तरी अत्यंत कमी फरकाने तो या चाचणीत नापास झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये तीन दिवसांपूर्वी संजू ‘अ’ संघातील इतर खेळाडूंबरोबर फिटनेस चाचणीसाठी उपस्थित झाला होता, मात्र त्याच्या फिटनेसमधील उणिवा यादरम्यान उघडकीस आल्या. परिणामी त्याचे गुण कमी भरले. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी निवड करण्यात आलेल्या संघाची चाचणी १५ आणि १६ जूनला होणार आहे.