
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
तळोजा जेलमधील कोठडीत आपल्याला मटण, बिर्याणीसह कोणतेही नॉनव्हेज जेवण मिळत नाही. कोठडी अस्वच्छ आहे. सूर्यकिरणही कोठडीपर्यंत पोहचत नाही, अशी तक्रार माफिया डॉन अबू सालेम याने पोर्तुगाल सरकारकडे केल्यानंतर पोर्तुगाल दुतावासातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी तळोजा जेलला भेट दिली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली.
अबू सालेमला पोर्तुगालमध्ये अटक केल्यानंतर त्याला गुन्हेगार प्रत्यार्पण करारानुसार हिंदुस्थानमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी पोर्तुगाल सरकारने टाकलेल्या अटींचा महाराष्ट्र पोलीस दलाकडून भंग केला जात आहे, असा आरोप अबू सालेमची वकील सना कुरेशी हिने आज पत्रकारांशी बोलताना केला.
तळोजा जेल हे माझ्यासाठी सुरक्षित नाही. येथे एकदा माझ्यावर हल्ला झाला होता. ज्या कोठडीत मला ठेवले आहे तेथील वातावरण चांगले नाही. तिथे कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. कोठडीतील टॉयलेट अस्वच्छ आहे, अशा तक्रारी अबू सालेमने हिंदुस्थानविरोधात पोर्तुगाल सरकारकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन पोर्तुगाल दुतावासातील अधिकाऱ्यांनी आज तळोजा जेलला भेट दिली. जेल व्यवस्थापनाकडून अबू सालेमला दिल्या जात असलेल्या सुविधांची चौकशी केली. अबू सालेमबरोबरही सविस्तर चर्चा करून त्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या.































































