राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीला शरद पवार का गेले नाहीत ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक इफ्तार पार्टी ठेवली होती. ही इफ्तार पार्टी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना न बोलावल्याच्या अफवांमुळे आधीपासूनच चर्चेत होती. या इफ्तार पार्टीला बहुतांशी विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. १८ पक्षाच्या नेत्यांना या इफ्तार पार्टीला आमंत्रित करण्यात आलं होतं. २०१५ नंतर काँग्रेसने पहिल्यांदाच अशी इफ्तार पार्टी आयोजित केली आहे, हे विशेष आहे.

या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डी.पी.त्रिपाठी हे मात्र उपस्थित होते. विरोधी पक्षातील दिग्गज मंडळी या इफ्तार पार्टीला उपस्थित असताना शरद पवार या पार्टीला कसे नाहीत हा अनेकांना प्रश्न पडला होता.  शरद पवार यांना ९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. शरद पवार हे रसिक आहेत, वाचन, नाटक हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. पवारांनी या कार्यक्रमाचं निमंत्रणही आधीच स्वीकारलं होतं. यामुळे दिल्लीतील इफ्तार पार्टीला न जाता त्यांनी मराठी नाट्य संमेलनाला आवर्जून हजेरी लावली.

काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जनता दल संयुक्त, सीपीआय(एम), जनता दल धर्मनिरपेक्ष,तृणमूल काँग्रेस, बसपा, डीएमके, राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. तेलगू देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडूंनाही आमंत्रण पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यांच्यातर्फे कोणीही आलं नाही.