जायकवाडीच्या डाव्या कालव्याखाली ९० हजार हेक्टर्सचे सिंचन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बद्रीनाथ खंडागळे । पैठण

नाथसागरात यावर्षी पुरेसा जलसाठा असल्यामुळे लाभक्षेत्राला ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याखाली यंदा तब्बल ९० हजार हेक्टर शेतजमिनीवरील उन्हाळी पिकांचे सिंचन करण्यात आले आहे. संभाजीनगर, जालना, परभणी या ३ जिल्ह्यातील १० तालुक्यांना याचा लाभ मिळाला आहे. यासाठी सलग १०२ दिवस प्रतिसेकंद २ हजार क्युसेक्स याप्रमाणे पाणी कालव्यात सोडण्यात आले, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे दगडी धरण उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी दै. ‘सामना’ शी बोलताना दिली.

वर्षानुवर्षे घटत चाललेले पर्जन्यमान व गोदावरी नदीच्या नाशिक भागात अडवले जाणारे पावसाचे पाणी यामुळे ७-८ वर्षांत नाथसागराची पाणीस्थिती बिकट होत गेलेली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी तयार केलेले हे धरण केवळ नावाला ‘सिंचन प्रकल्प’ राहिलेले आहे. कारण राज्य शासनाने पाणीवापराचा प्राधान्यक्रम बदलून सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. दुसरा क्रमांक एमआयडीसीसाठी आहे. शेतीसाठीचा क्रम शेवटचा आहे. त्यामुळे धरणातील पाणीस्थितीचा फटका मात्र प्राधान्यक्रमाने कृषी सिंचनाला बसू लागला आहे.

दरम्यान, या निराशाजनक पाश्र्वभूमीवर यावर्षी लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना निसर्गाच्या कृपेने ‘अच्छे दिन’ पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी पावसाळा संपला तेव्हा नाथसागर तुडुंब भरलेला होता. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड व दगडी धरण उपअभियंता अशोक चव्हाण यांनी नियोजन केले. त्यानुसार सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक असा ‘नियोजित पाणी वापर’ चा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आला. १ मार्च २०१८ रोजी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. या कालव्याची पाणीवहन क्षमता १ हजार ८०० क्युसेक्स एवढी असताना २ हजार क्युसेक्स याप्रमाणे पाणी सोडण्यात आले. प्रत्येकी २१ दिवसांची पाणीपाळी असते. तथापि शेतकऱ्यांच्या पाणी मागणीला प्राधान्य देऊन डावा कालवा सलग १०२ दिवस वाहत राहिला. त्यामुळे २०८ किलोमीटर लांबीच्या या कालव्याखाली विक्रमी शेतजमीन ओलीत करता आली. या कालव्याचे शाखा-कालवे, चाऱ्या, उपचाऱ्या अशा एकूण जलवितरण प्रणालींची लांबी तब्बल १ हजार ३५० किलोमीटर एवढी प्रचंड आहे. पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता डी.एस. अजमेरा, एस.बी. शेख व पी.एल. देशपांडे यांनी यंत्रणा राबवली. खालील ३ जिल्ह्यांतील १० तालुक्यांना याचा लाभ मिळाला. पैठण (संभाजीनगर), अंबड, घनसावंगी, परतूर, (जालना), पाथरी, पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, व गंगाखेड (परभणी) आदी. वरील लाभक्षेत्रातील जवळपास ९० हजार हेक्टर शेतजमिनीचे या पाण्यामुळे सिंचन झाले आहे. उन्हाळी भुईमुगाला चांगला फायदा झाला. उसाचे बारमाही पीक या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उसासह विविध प्रकारच्या फळबागांनाही डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे नवजीवन मिळालेले आहे. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीला आजमितीस नाथसागरात २३.१० टक्के पाणीसाठा असल्यामुळे पुढील वर्षीही सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
२ कोटींची विक्रमी पाणीपट्टी वसुली !

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाने मुबलक पाणी दिले असले तरी यावर्षी शेतकऱ्यांनीही पाणीपट्टी देताना हात आखडता घेतला नाही. जायकवाडी धरणाच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच २ कोटी रुपयांची विक्रमी पाणीपट्टी वसूल झालेली आहे, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे दगडी धरण उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.