
सामना प्रतिनिधी । मुंबई
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी युवा सेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. प्रमाणपत्र सादर करण्यास शिक्षणमंत्र्यांनी २३ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. त्याचप्रमाणे ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असतील ते पडताळणी प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची प्रतही प्रवेश अर्जाला जोडू शकतील. इतकेच नव्हे तर या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना होणारा त्रास कायमचा दूर व्हावा म्हणून पुढील वर्षीपासून दहावीच्या निकालासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.
दहावीत दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ची सवलत लागू करण्यात आली पण या एटीकेटीच्या अकरावी प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यंदा बायफोकलसह आर्टस्, कॉमर्स, सायन्स शाखेच्या चार नियमित प्रवेशफेऱया झाल्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर निर्णय घेतला जाणार आहे. तोवर या विद्यार्थ्यांचे अकरावीचे अर्जही भरले जाणार नाहीत.
-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली गेली होती. त्यामुळे लाखो विद्यार्थी चिंतेत पडले होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनेवरून युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, सुप्रिया करंडे, शीतल देवरुखकर यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली.
-शिक्षणमंत्र्यांनी मुदतवाढ देतानाच संबंधित अनेक निर्णयही घेतले जातील असे आश्वासन दिले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तारीख वाढवून देण्यात येऊन पहिली फेरी ३० जूनपर्यंत होईल आणि तत्पूर्वी २७ जूनपर्यंत समाजकल्याण व शिक्षण खात्यातर्फे २७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितल्याची माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.























































