
विजय जोशी, नांदेड
सिंचनाचा प्रश्न कोट्यवधी रुपये खर्च करुन जसेच्या तसे, परिसरातील तलावांचा गाळ काढण्यास प्रशासनाची चालढकल तसेच ४५ गावांच्या मुख्य रस्त्यांची चाळणी झाल्याने धर्माबाद तालुक्यातील सरपंच संघटनेने तेलंगणा राज्यात आम्हाला समाविष्ट करा, ही केलेली मागणी व त्याची गंभीर दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेऊन आदेश दिल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पालकमंत्री रामदास कदम यांच्या सुचनेनुसार मुंबई येथे धर्माबाद तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी १८ जून रोजी मुंबईत मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद हा तेलंगणाच्या सीमेवर असलेला तालुका. मिरची आणि धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यासोबतच प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा ही पिकेही घेतली जातात. अलिकडच्या काळात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादकता वाढविण्यासाठी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जाणिवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. मात्र सिंचनाच्या सोयी-सुविधा नसणे ही शेतकऱ्यांची प्रमुख अडचण आहे. मागील चाळीस वर्षांपूर्वीचा बिलोली तालुका आणि आताचा धर्माबाद तालुक्यात समाविष्ट असलेल्या भागावर राज्यकत्र्यांनी विकासाच्या कामांमध्ये अन्यायच केला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुढारी या प्रकाराला जबाबदार आहेत. मात्र वर्षानुवर्षे तेच ते प्रश्न प्रलंबित राहिल्याने काही ठराविक व्यक्तींनी तेलंगणा राज्यामध्ये धर्माबाद तालुक्याचा समावेश करावा, अशी मागणी केली. सरपंच संघटनेच्या यामध्ये पुढाकार होता. धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न मार्गी लागावेत, उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित कराव्यात,२४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बाभळी बंधाऱ्याचा धर्माबाद तालुक्याला कुठलाही उपयोग होत नसल्याने पाणी वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, तेलंगणाच्या धर्तीवर सीमेपर्यंतचे बिद्राळी, बेलतरोडा, कुंदकुर्ती, नायगाव (ध.) कडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण करावे, तालुक्यासाठी वरदान असलेल्या ३९ मालगुजारी तलावातील गाळ काढण्यात यावा या प्रमुख मागण्या सरपंच संघटनेने केल्या आहेत.
गेली अनेक वर्षापासून स्थानिक पातळीवरील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी या मागण्या पुढे केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाकडून यापैकी कुठलीही मागणी मंजूर झाली नाही. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना खरिप आणि रब्बी हंगामाच्यावेळी प्रतिहेक्टर चार हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम काँग्रेस आणि भाजप सरकारकडून झाले आहे. सरकारच्या उदासीन धोरणामुळे सरपंच संघटनेने तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा देवून धर्माबाद तालुक्याच्या तेलंगणात समावेश करावा या मागणीचे निवेदन निजामाबादच्या खासदार कविता आणि आमदार गोवर्धन रेड्डी यांना दिले.
या बाबीची गंभीर दखल घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी धर्माबादच्या शिष्टमंडळाला पाचारण केले होते. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांच्या पुढाकारातून धर्माबादच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सरकार पातळीवर सूत्रे हालली आहेत. उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या विषयात लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.
पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत १८ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्हा प्रशासनातले उच्चपदस्थ अधिकारी तसेच धर्माबादचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुकास्तरीय विविध कार्यालयाचे प्रमुख यांना बोलाविण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, आमदार सुभाष साबणे यांच्या प्रयत्नामुळे धर्माबाद तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

























































