लिफ्ट देणे पडले ८३ हजारांना, तरुणाला मारहाण करून लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

अनोळखी व्यक्तीला दुचाकीवरून लिफ्ट देणे तरुणाला महागात पडले आहे. गाडीची चावी काढून घेऊन, मारहाण करून खिशातील ५०० रुपये, सोन्याची साखळी आणि मोटारसायकल असा ८३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला. ही घटना सिंहगड रस्ता येथील गणेशमळ्यातील सीताबाग कॉलनी येथे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

शंकर राठोड (वय २३, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल केला आहे. शंकर राठोड हे वारजे येथे भावाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येताना एकाने त्यांना दांडेकर पूल भागापर्यंत लिफ्ट मागितली. सिंहगड रस्ता येथील गणेशमळा येथे आल्यानंतर त्याला थोडेसे आतमध्ये जाऊन सीताबाग कॉलनीमध्ये मोरेश्वर सभागृहासमोर दुचाकी थांबविण्यास सांगितली. दुचाकी थांबविल्यानंतर त्याने राठोड यांना शिवीगाळ करीत गाडीची चावी काढून घेतली. मारहाण करीत जबरदस्तीने खिशातील ५०० रुपये आणि गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. त्यानंतर राठोड यांची मोटारसायकल घेऊन तो पळून गेला. हा प्रकार दत्तवाडी पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्यापि लूटमार करणाऱ्याबद्दल कोणतीही माहिती त्यांना मिळालेली नाही. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. जी. डफळ तपास करीत आहेत.