
सामना प्रतिनिधी । नागपूर
रामटेक लगतच्या नगरधन ते मानपूर या भागात काळाविटाचा शिकार केलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती रामटेकचे साहाय्यक वनसंरक्षक विशाल बोऱ्हाडे यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
रामटेकपासून आठ किमी अंतरावरील नगरधनच्या रहिवाशांनी १८ जूनला फॉरच्युनर क्रमांक एमएच ३१ सीएक्स ७००० घेऊन संशयास्पद फिरत असलेल्या तीन इसमांना पकडून रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास रामटेक पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी नगरधन परिसरात काळविटाची शिकार झाली. त्यामुळे हे शिकारी फॉरच्युनरमधील प्रवाशी असावे, असा अंदाज गावकऱ्यांचा आहे. त्यांना पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर सोडून दिले असले तरी ते या शिकारी सहभागी असल्याचे नाकारता येत नाही.































































