मध्य रेल्वे वापरणार स्मार्ट कॅमेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टन रोड येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सावध झालेल्या मध्य रेल्वेने आता गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सहा महत्त्वाच्या स्थानकांची निवड केली आहे. या स्थानकांतील जादा गर्दी होणाऱया पादचारी पुलांवरील गर्दीचे प्रमाण मोजण्यासाठी व्हिडीओ ऍनाल्टीक्स कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येथे प्रमाणाच्या बाहेर गर्दी जमताच हे स्मार्ट कॅमेरे बजर वाजवून नियंत्रण कक्षात ‘ऍलर्ट’ जारी करणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोडवर गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी अचानक पाऊस येऊन गर्दी वाढल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेला होता. त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वेने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक प्रयोग चालविले आहेत. स्थानकांचे गर्दी आत आणि बाहेर पडण्याचे मार्गातील अडथळे दूर करण्याबरोबरच स्टॉल हटविण्यासह अनेक बाबींवर काम करण्यात आले. तसेच मध्य रेल्वेच्या गर्दींच्या स्थानकांत गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी ‘मॉकड्रील’ही करण्यात आली.

मध्य रेल्वेने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अलीकडेच नाशिकच्या कुंभमेळय़ाचे यशस्वी आयोजन करणारे आयपीएस अधिकारी डॉ. रवींद्र सिंगल यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. तसेच नाशिकच्या कुंभमेळय़ात गर्दीची गणना करणारी सेन्सरवाली ‘चटई’चा प्रयोगही ठाणे रेल्वे स्थानकांत करण्याची योजना आखली. परंतु संबंधित तंत्रज्ञान नावावर असलेल्या तरुणाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने तो प्रयोग मागे पडला. आता मध्य रेल्वेने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सहा गर्दीच्या स्थानकांची निवड केली आहे. या स्थानकांच्या नेहमी गर्दी होणाऱया पादचारी पुलांवर व्हिडीओ ऍनाल्टीक्स कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कॅमेऱयात पादचारी पुलांच्या उताराच्या एका चौरस फुटाच्या जागेत नेमकी किती माणसे उभी राहू शकतात याची संख्या नोंदविण्यात येते. त्यानंतर त्यापेक्षा जर जादा माणसे तेथे आली तर हे स्मार्ट कॅमेरे लागलीचे बजर वाजवून नियंत्रण कक्षाला खबर देतात असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले.

या सहा स्थानकांमध्ये गर्दी होताच बजर होणार
मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सहा स्थानकांच्या सर्वाधिक गर्दी होणाऱया पादचारी पुलांवर व्हिडीओ ऍनाल्टीक्स कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे. कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्र.४ व ५ तर ठाण्याच्या ५ व ६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील पादचारी पुलांवर हे स्मार्ट कॅमेरे लागतील. मध्य रेल्वेने गर्दीचे नियोजन करण्यासाठी २५९ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची भरती केली आहे, तर आणखी १२२ होमगार्डची भरती केली जाणार आहे.