बँकासह खातेदारांना गंडविणारी आंतरराज्य टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

एखाद्या खातेदाराच्या नावाने बनावट धनादेश व इतर कागदपत्रे तयार करून या धनादेशाचा वापर करून आपल्या खात्यात लाखो रुपये जमा करून घेत ही रक्कम विड्रॉल स्लीप अथवा एटीएम कार्डआधारे काढून घेणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा, सायबर सेलच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या एकूण पाच जणांना एकच वेळी विविध राज्यांतून अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी हा गुन्हा नेमका कशा प्रकारे केला आहे आणि त्यांच्या गुन्ह्याची व्याप्ती किती आहे, याचा शोध घेण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या पाचही जणांना ९ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही फसवणूक सर्वात प्रथम ठाणे जनता सहकारी बँकेच्या गारखेड्यातील परिजातनगर येथील शाखेचे व्यवस्थापक संग्राम सदानंद शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांच्या बँकेत मेसर्स हरीश इंटरप्रायजेस नावाने एक खाते आहे. हे खाते हरीश गुंजाळ यांच्या मालकीचे आहे. गुंजाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रहिवासी असून त्यांनी १ जून रोजी त्यांच्या खात्यात गोजित फायनान्शियल सव्र्हिसेस यांचा युनियन बँक ऑफ इंडियाचा एक धनादेश आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी दाखल केला. या धनादेशाआधारे ३ लाख ९३ हजार २६४ रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यांनी ही रक्कम विड्रॉल स्लिप वापरून काढून घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा याच गोजित फायनान्सचा आणखी एक ४ लाख ८० हजारांचा धनादेश वटविण्यासाठी आपल्या खात्यावर जमा केला.

दरम्यान, बँकेचे व्यवस्थापक संग्राम शिंदे यांच्या लक्षात आले की, गोजित फायनान्सच्या नावे यापूर्वी जमा झालेला धनादेश बनावट होता व त्याआधारे ३ लाख ९३ हजार रुपये गुंजाळ यांनी आपल्या खात्यात वळवून घेतलेले आहेत. त्यांनी तात्काळ पुढील धनादेश वटविण्यापासून रोखला आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात झालेल्या फसवणुकीविषयी फिर्याद दिली. हा प्रकार आर्थिक फसवणुकीशी आणि अत्याधुनिक संगणकीय पद्धत वापरून केलेली फसवणूक असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखा व सायबर सेलकडे तपासासाठी आले. त्यांनी बारकाईने आणि अतिशय जलदगतीने पावले उचलून या प्रकारची फसवणूक करणारी संपूर्ण टोळीच असू शकते, याचा अंदाज घेत सर्व संबंधितांचा गोपनीय शोध घेतला आणि सिंधुदुर्गच्या हरीश गुंजाळ याला कुडाळ येथून तर उत्तर प्रदेशातील मनीषकुमार जयराम मौर्या आणि रशीद इम्तियाज खान, पंजाबच्या मनदीपसिंग बनारसीदास सिंग आणि पश्चिम बंगालच्या डबलू शेख अरमान शेख यांना मुंबईतून एकाच वेळी पकडून संभाजीनगरला आणले. या टोळीच्या ताब्यातून विविध बँकांचे ९ पासबुक, विविध बँकांचे २६ चेकबुक, २७ एटीएम कार्ड, एक पैसे मोजण्याची मशीन, विविध नावांनी तयार केलेले ९ रबरी शिक्के, ४ मतदान कार्ड, ५ पॅनकार्ड, संगणक, कलर प्रिंटर, सीपीयू तसेच १५ मोबाईल आणि रोख १ लाख ७६ हजार ९२० रुपये असा महत्त्वपूर्ण ऐवज जप्त करण्यात आला आहे. इनोव्हा कारसह जप्त मालमत्तेची एवूâण विंâमत ९ लाख ८९ हजार ३२० रुपये एवढी आहे.

आधारकार्डवरच बदलत होते पत्ता
हरीश गुंजाळसह पाचही जण विविध शहरांत किरायाने खोली करीत त्याची भाडे पावती घेत त्यानंतर आधार कार्डवर आधार वेंâद्रात जाऊन पत्ता बदलून घेत. खाते उघडण्यासाठी लागणारे सर्व बनावट दस्तऐवज तयार करून सहकारी बँकेत आणि राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडत असत. या खात्यावर ते एखाद्या खातेदाराच्या नावाचा बनावट धनादेश जमा करीत व त्याच्या खात्यातून आपल्या खात्यावर रक्कम वळती झाली की, ती लगेचच विड्रॉल स्लिप किंवा एटीएम कार्डच्या आधारे काढून घेत. अशा प्रकारे या टोळीने महाराष्ट्रातील कराड, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात मनीनगर, सूरत, केरळ एर्नाकुलम आदी विविध शहरांतील विविध बँकांमध्ये विविध नावांनी खाती उघडलेली होती. या टोळीने एकट्या संभाजीनगर शहरातच टीजेएसबी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, गोजित फायनान्शियल सव्र्हिसेस, स्टेट बँक ऑफ इंडियासह विविध खासगी को-ऑप. बँकांसह १९ बँकांमध्ये खाती उघडली असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले.

अशी करत होते फसवणूक
त्यांचे ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेतील मोठ्या व्यापारी, कंपनी किंवा उद्योजकांचे धनादेश नंबर ते मिळवत. मग त्यांचा बनावट धनादेश तयार करीत. त्यावर त्यांच्या खात्यावरील रकमेचा अंदाज घेत त्यावर रक्कम टाकून, संबंधित खातेदाराची बनावट सही करून धनादेश आपल्या खात्यात वटविण्यासाठी टाकत. हे सारे उपद्व्याप करण्यास त्यांना संगणक, प्रिंटर, बनावट स्टॅम्प वगैरेचा वापर केला जात असे. ही पद्धत वापरून शहरात त्यांनी तब्बल १९ बँकांची फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त दीपाली धाटे घाटगे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सायबर सेलचे गुरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, तोडकर, अफरोज शेख, हेडकॉन्स्टेबल भाऊराव राठोड, नितीन मोरे, हिरा राजपूत, दत्तात्रय गढेकर, मनोज चव्हाण, शेख हकीम, भगवान शिलोटे, खरे संतोष सूर्यवंशी, संजय खोसरे, नवाब शेख, विरेश बने, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.