
मधुकर ठाकूर । उरण
मागील पंधरा दिवसांपासुन सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे उरण शहर, ग्रामीण आणि औद्योगिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई, पुनाडे धरण क्षेत्रात समाधानकारक पाणी पडला आहे. पाऊस पडण्याची स्थिती अशीच राहिल्यास रानसई धरण जुलै महिन्याच्या अखेरपर्यत ओसंडून वाहू लागेल, असा विश्वास उरण एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी व्यक्त केला.
उरण शहर, ग्रामीण भागातील ३५ गावे आणि परिसरातील औद्योगगिक क्षेत्राला रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. ११६ फुट उंचीच्या धरणात सध्या १०५ फुट ५ इंच पाणी जमा झाले आहे. रानसई धरणात २८ जुनपर्यत ४८७ मीमी पाऊस पडला आहे. पाऊस पडण्याचे प्रमाण जुन प्रमाणेच राहिल्यास रानसई धरण जुलै महिन्याच्या अखेरपर्यत ओव्हरफ्लो होईल, असा विश्वास एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी. बिरंजे यांनी व्यक्त केला.
उरण पुर्व भागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन आदी १० गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पुनाडे धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडला आहे. तर चिरनेर येथील आक्कादेवीच्या डोंगरात असलेले छोटेखानी आक्कादेवी धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडला आहे. उरण परिसरात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




























































