बोंबलाची भजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर, [email protected]

माझ्या एका (आता आयुष्यातून गेलेल्या) मित्राला आमच्याकडची कायस्थी कोलंबीची खिचडी व बोंबलाची भजी खाण्याची अनिवार ओढ लागली होती. मी त्याला बोलावलं. तो कोलंबी व बोंबिल आणून द्यायला निघाला. मी त्याला रोखले व समजावले, आमच्याकडचे जेवण म्हणजे आमच्याकडचे जेवण असते. त्यातला आर्थिक वाटा कोणी उचलावा अशी आमची अपेक्षा नसते. आम्हाला ते रुचतही नाही. (पार्टीत सहभागी होणाऱया प्रत्येकानं घरून काहीतरी करून घेऊन यायचं ही अमेरिकेची ‘पॉटलक’ पद्धत आमच्या परभटी रक्तात नाही.) आम्ही आमच्याकडे खायला घालतो किंवा दुसरीकडे (बोलावलं तर) जाऊन खातो. इधर से थोडा उधरसे थोडा हा प्रकार आम्हाला मानवत नाही. ‘पॉटलक’ या संकल्पनेबाबत मी अनभिज्ञ होतो तेव्हा अमेरिकेत मी एका घरी गृहिणीपाशी मटणाची तारीफ केली. तिचा चेहरा कोरा राहिला. नंतर मला कळलं की ते मटण दुसऱ्याच कोणी करून आणलं होतं. यजमान गृहिणीनं केवळ ‘सॅलड’ केलं होतं. म्हणजे काकडी, टोमॅटो व कांदा. त्यानंतर त्या पार्टीला तिची पार्टी का म्हणायचं हेच मला कळेना. ती नाक वर करून का फिरत होती हेही कळलं नाही. मटणही तिनं केलं असतं तर ती बहुधा छताला पाय लावून फिरली असती.

एकाला बोलावण्यात काय मजा, असा विचार करून मी मित्रांच्या गोतावळय़ाला आवताण दिलं. जास्त माणसं म्हणून जेवणात जास्त प्रकार आले. कोलंबीची खिचडी व बोंबलाची भजीच्या जोडीला मटण, तळलेली सुरमई व भरलं पापलेट आलं. हॉटेलात (पैसे मोजून) ऑर्डर केल्यागत माझे मित्रगण जेवणावर तुटून पडले. आपण वेफर्स खाऊ शकणार नाही अशी त्यांनी बोंबलाची भजी हादडली. घाण्यामागून घाणा त्यांच्या ताटात रिकामा होत होता. सुरमई, पापलेट व मटणाला राग येणार नाही याचीही ते काळजी घेत होते. कोलंबीच्या खिचडीच्या नुसत्या वासाने त्यांचे आधी गिळलेले जिन्नस पचत होते. (त्यानंतर परवा अविनाश खर्शीकर व अतुल परचुरे हे सन्मित्र एकमुखात म्हणाले, – ‘कणेकरांची पार्टी? वाट बघा.’)

गंमत तर पुढेच आहे. ज्या मित्रासाठी ही खादाडी ठेवलेली होती तो उगीच उष्टावल्यासारखा जेवला. जेवलाच नाही म्हणा ना.

‘काय रे?’ मी त्याला आश्चर्यानं विचारलं.

‘घरी पूजा होती.’ तो म्हणाला, ‘मी संध्याकाळी पाचला जेवलो. पोटात जागाच नाही.’

आपलं ठरलं होतं तर संध्याकाळी पाच वाजता इतका तुडुंब का जेवलास, हा प्रश्न विचारण्याइतकं त्राण माझ्यात नव्हतं. नाही म्हणायला निघताना त्यानं बोंबलाच्या भजीची ‘रेसिपी’ विचारली. आम्ही लिहून दिली. तिच्यावर एक नजर टाकून तिचा चोळामोळा करून फेकून देत तो म्हणाला, ‘एवढं कोण करायला बसलंय?’

आम्ही होतोच बसलेले. महामूर्ख.

संगीतकार ओ. पी. नय्यरनं घरी जेवायला येऊन माझी अशीच गोची केली होती. नॉनव्हेज नाही, तेलकट-तुपकट नाही, तिखट नाही, गोड नाही अशी कमालीची पंचाईत करणारी नकारघंटा त्यानं आधीच वाजवली. डोकं खाजवून आम्ही पुरी, बटाटय़ाची भाजी, व्हेज पुलाव असा (आमच्या दृष्टीनं पुचाट) मेनू ठरवला. जेवायला बसल्यावर ताटाकडे बघून तो म्हणाला, ‘बटाटा नाही. तळलेली पुरी नाही, भात नाही…’

क्षणभर मी दिग्मूढ झालो व मग ओ.पी.ला म्हणालो, – ‘चला उठा. हात धुऊन घ्या.’ (मग तो गुमान जेवला हा भाग वेगळा.)

परवा पेपरात आलं होतं. संभाजीनगरमधला एक जावई घरी जेवून सासरी जेवायला गेला. तो जेवून आल्याचं कळल्यावर सासरची मंडळी संतप्त झाली. इथपर्यंत मी समजू शकतो, पण त्यानंतरचा त्यांचा उद्रेक लोकविलक्षण होता. त्यांनी जावयाला झोडून काढला. त्यासाठी त्यांनी पोलादी कांबेचाही वापर केला. शेवटी पोलिसांनी त्यांना अटक केली. जखमी जावई सासरी जेवला का, त्याचं काय झालं याचा बातमीत उल्लेख नव्हता. एकट्या जावयाचं जेवण वाया गेलं असतं. आता अख्ख्या सासुरवाडीचं जेवण वाया गेलं. कोठडीत कोण बसलंय त्यांना (जावई) भोजन द्यायला?

पण सासरी जेवायला जाताना जावई घरी जेवून का गेला असेल? माझा मित्र माझ्याकडे कोलंबीची खिचडी व बोंबलाची भजी खायला म्हणून आला आणि तत्पूर्वी संध्याकाळी पाच वाजता घरी भरपेट जेवून का आला?

माझ्या मित्रालाही मी झोडून काढायला हवा होता का? घरात लोखंडी कांब नसली म्हणून काय झालं?…