
>> द्वारकानाथ संझगिरी, [email protected]
यावेळी इंग्लंडच्या भटकंतीत मी माझं एक खूप दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न पुरं केलं. इंग्लिश चॅनेलच्या काठावरच्या डोव्हरचे पांढरे डोंगर जवळून पाहायचे.
ज्या गोऱया गोष्टींनी मला भुरळ घातली आहे त्यात हे डोंगर आहेत. याआधी लांबून मी किमान तीन एकदा ते पाहिले आहेत. इंग्लिश खाडी ओलांडून बोटीने युरोपात जाताना किंवा परत येताना! पण एलिझाबेथ टेलर ही फक्त लांबूनच पाहावी अशी गोष्ट नाही. जवळून पाहायला मिळाली असती तर माझा चेहरा विम्बल्डन कोर्टवरच्या बियॉन बोर्गसारखा कोरडा नक्कीच राहिला नसता. त्यावरचे भाव बदलले असते. मनात आनंदाचे कारंजे उडाले असते. डोव्हरचे पांढरे कडे जवळून पाहतानाही चेहऱयावरचे भाव बदलले. मनात कारंजे उडाले, पण कारणं वेगळी होती. दोघांचं सौंदर्य, पार्श्वभूमी यात फरक होता.
इंग्लिश चॅनेल (इंग्लिश खाडी), ते पांढरे डोंगर मनात विविध कारणांनी घर करून बसले होते. शाळेत चार्ल डिकन्सची टेल ऑफ टू सिरीज वाचल्यावर (तेव्हा आपण सिडने कार्टन व्हावं अशीही इच्छा होती. पण त्याग किती कठीण असतो हे पुढे जाणवलं) किंवा एखादा हिंदुस्थानी जलतरणपटू इंग्लिश खाडी पोहून गेल्यावर किंवा दुसऱया महायुद्धाबद्दल वाचताना हे पांढरे कडे, न पाहताच सह्याद्रीच्या कडय़ाएवढे जवळचे झाले होते. परवा डॉ. गोविंद काणेगावकर त्यांच्या उघडय़ा लालचुटुक स्पोर्टस् व्होल्व्होतून मला तिथे घेऊन गेले. तेव्हा त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. १९८३ साली मी प्रथम इंग्लंडला गेलो. तेव्हा युरोपातही पाऊल मी टाकलं होतं. डोव्हरवरून कॅलेला जाताना बोटीच्या डेकवर उभा राहून मी एकटक त्या डोंगरांकडे पाहत होतो. जणू ते मायकल एंजेलोचे शिल्प आहे. देवाचं हे शिल्प मला जबरदस्त भावलं होतं. माझा मित्र बोटीत मस्तपैकी स्कॉच प्यायला गेला. मला असं निसर्गचित्र दिसलं की त्याचीच नशा एवढी होते की जगातल्या सर्वोत्तम स्कॉचची उसनी नशा नको असते. एखाद्याला तो दगडासारखा दगडही वाटेल. प्रत्येकाला डोळे असतात, पण नजर असतेच असं नाही आणि असली तर वेगवेगळी असू शकते. त्यावेळी पाण्याकडे पाहताना ती खाडी पोहून गेलेल्या मंडळींपैकी अविनाश सारंग, तारानाथ शेणॉय हे चेहरे माझ्या डोळय़ांसमोर तरळून गेले. काय शारीरिक क्षमता, मानसिक जिद्द आणि लाटांशी, वाऱयाशी कदाचित माशांशी झुंजण्याचं कौशल्य असावं त्यांचं! परवा डॉ. काणेगावकरांनी सागितले की, ते जलतरणपटू पांढऱया शिखरांच्या जवळून सुरुवात करतात आणि एकवीस मैल पोहतात. त्या खाडीच्या पाण्याचं तापमान पंधरा सेंटीग्रेटपेक्षा कधीही जास्त नसतं. बहुतेक वेळा कमीच असतं.
आम्ही सहा-सात जण एकत्र होतो. गोविंदराव आम्हाला लिंगडॉन शिखरावर घेऊन गेले. गाडी तुम्हाला बऱयापैकी वर घेऊन जाते. तिथून ३०-४० डिग्रीचे दोन उतार आहेत. मग रस्ता. त्या रस्त्याने वर शिखराजवळ जाता येतं. वारा वाहत होता. त्यामुळे अंगावर जॅकेट होतं. डोक्यावर कानटोपी होती. त्या वेळी पंधरा डिग्री पाण्यात पोहण्याचा विचार केला तर थंडीत अंगाला घाम फुटतो. डॉक्टर बरोबर असले की चढ चढायला आणि उतरायला भीती वाटत नाही. काणेगावकरांसारखा हुशार डॉक्टर बरोबर म्हटल्यावर देवाने अदृश्य कवचकुंडल दिलंय असं मला वाटलं. तो उतार उतरून पुढे रस्त्याने शिखराकडे चढत जाताना समोर गोदी (डॉक्स) दिसते. जेट्टीला लागलेल्या अजस्त्र्ा बोटी दिसतात. त्या बोटींच्या पोटात मोठमोठे कंटेनर्स, गाडय़ा गुडुप होतात आणि मग फ्रान्सच्या किनाऱयावरच्या कॅलेला बाहेर येतात. दूरवरून एक लक्झरी लायनर सुटताना दिसली. कॅलेला जाणाऱया बोटी तर तासातासाने सुटत असाव्यात. दूरवर एका डोंगराकडे बोट दाखवून डॉ. काणेगावकर म्हणाले, ‘तिथून चॅनेल टनेल जातो.’ खाडीखालून जाणारा बोगदा खणायची चर्चा सुरू होती. त्या वेळी मी इंग्लंडमध्ये होतो. १९९० वगैरे साल असावं. मला अजून आठवतंय काही बुजुर्गांनी या बोगद्याला विरोध केला होता. जणू इंग्लंडचं चिलखत आणि शिरस्त्र्ााण काढून फेकून दिलं जातंय अशी त्यांची भावना होती. त्या भावना म्हणजे इतिहासात रमणं असलं तर त्या अस्सल होत्या. याच खाडीने इंग्लंडला नेपोलियनच्या आक्रमणाच्या वेळी आणि विशेषतः दुसऱया महायुद्धात केवढा आधार दिला होता. हिटलरची इंग्लिश खाडी ओलांडायची का हिंमत झाली नाही, याचं उत्तर दुसऱया महायुद्धावरची अनेक पुस्तकं वाचूनही मला मिळालेलं नाही. त्याने बॉम्बचा वर्षाव लंडनवर केला. नव्वद दिवस लंडन भाजून काढलं, पण वामनाच्या तीन पावलाच्या थाटात युरोप पादाक्रांत केल्यावरही त्याने खाडीत पाय नाही ठेवला. तिथे त्या शिखराजवळ नऊशे वर्षे जुना किल्लाही आहे. इंग्लंडच्या बचावाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. त्यात एका बोगद्यात दुसऱया महायुद्धाच्या काळात अद्ययावत रुग्णालयही होतं. त्याची कधी गरज लागली नाही, पण डॉ. काणेगावकर सांगतात १९८४ साली ते केंटमध्ये काम करीत असताना जनतेसाठी ते रुग्णालय खुलं होतं.
एका शिखरावर पांढऱया दगडाला मी स्पर्श केला. अंगावर रोमांच उठले. हे सर्व मानसिक असतं. पहिला तारुण्यसुलभ स्पर्शासारखा तो स्पर्श वाटणं हा मनाचा खेळ होता. त्यात एक छोटंसं स्वप्न पुरं झाल्याची भावना होती. खाली पाहिलं की तो मयूरपंखी समुद्र डोळय़ांत साठवून ठेवावासा वाटतो. तो समुद्र मी पापणीत गुंडाळून डोळय़ांच्या एका कप्प्यात ठेवून दिलाय. मला आठवण झाली की मी कप्पा उघडतो आणि तो समुद्र माझ्या डोळय़ांसमोर येतो. डोव्हरच्या या पांढऱया खडूच्या डोंगराचं आकर्षण असणारा मी एकटाच नाही. मला एका महानतम लेखकाची सोबत आहे. त्याचं नाव विल्यम शेक्सपियर! तो तिथे बसून सॉनेटस् लिहायचा. (सॉनेट म्हणजे चौदा ओळींची विशिष्ट आकृतीबंध असलेली कविता) त्याच्या ‘किंग लियर’ या नाटकात त्याने या पांढऱया शिखराचा अनेकदा उल्लेख केलाय. तिथल्या एका टेकाडय़ाला शेक्सपियरचं नाव दिलंय.
दुसऱया दिवशी डॉक्टर मला त्यांच्या हाईथ या टुमदार गावात घेऊन गेले. इंग्लंडमधली गावं ही शहरापेक्षा राहायला मस्त. बरं शहराची बहुतेक सर्व सुखं तिथे मिळतात. त्या गावाचा हाय स्ट्रीट आमच्या गल्लीपेक्षा कमी रुंद असेल, पण किती सुंदर आहे. अंगावर किती टुमदार कॅफे, पब, दुकाने वगैरे तो मिरवतो. दागिन्याने नटलेल्या एखाद्या मुलीप्रमाणे. शहरातून एक कालवा जातो. त्याच्या आजूबाजूला बागा, धावण्याचा ट्रक वगैरे सर्व आहे. हा कालवा १८०१ साली नेपोलियनच्या आक्रमणाविरुद्ध बचाव म्हणून बांधला होता, पण नेपोलियन आलाच नाही. त्याला पकडून अलबा बेटावर ठेवण्यात आलं. तिथून तो पळाला. त्याला मग आर्चर वेलस्लीने हरवलं. याचं वेलस्लीने १८०३ मध्ये मराठय़ांचा पराभव केला. पुढे नेपोलियनला हरवल्यावर. त्याला लॉर्ड ऑफ वेलिंग्टन अशी पदवी मिळाली. त्याचं नाक लांबडं होतं. खंडय़ाळय़ाच्या एका शिखराला ‘डय़ुक्स नोज’ म्हणतात. तो हाच डय़ुक! वि. द. घाटेंनी ‘नागफणी’ असं सुंदर नाव दिल्यावरही आपण त्याला डय़ुक्स नोज म्हणतो. (नवीन वादाला जन्म तर देत नाही ना मी?) हा इतिहास डॉक्टरांनी सांगितला. तिथून त्यांनी डंगनेसमधले दोन दीपस्तंभ दाखवले. स्वॅलो पक्षी तिथून चार हजार मैलांचं स्थलांतर करतात. मलाही स्वॅलो होऊन ते पांढरे डोंगर, हाईथ गाव आणि त्यातल्या डॉक्टरांच्या किल्ल्यावर घिरटय़ा माराव्याशा वाटतात पुनः पुन्हा!




























































