
सामना प्रतिनिधी, नगर
जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांना आळा बसावा या करीता कोपरगाव तालुक्यातील किरण हजारे (वय ३२) याला १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश येथील जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी तसेच संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आता झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच अन्य गुन्हेगार यांच्या संदर्भातला प्रस्ताव एकत्रित तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोपरगांव तालुक्यातील संबंधित गुन्हेगाराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी हजारे यांच्यावर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यामध्ये, शिर्डी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे, कोतवाली पोलीस ठाण्यात एक, पुणे जिल्हयातील शिरुप पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, कोपरगांव तालुक्यात ११ गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. त्यामध्ये चोरी, दरोडे, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासरखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव कोपगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी तसेच स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करून तो मंजूरीसाठी पाठविला होता. तसेच अन्य चार ते पाच गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.























































