
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
फ़ुटबाँल हा सर्वाधिक लोकप्रिय जागतिक खेळ आहे याची साधी उमजही नरिंदर बात्रा यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाला नाही, म्हणूनच त्यांनी इंडोनेशियात खेळवल्या जाणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी हिंदुस्थानी फुटबॉल संघाला अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे टीकास्त्र अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाचे (एआयएफए) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोडले आहे.
फुटबॉल हा खेळ जगातले २१२ देश खेळतात आणि या खेळाचे जगभरात अब्जावधी चाहते आहेत, आशिया खंडातील ५ संघ फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळतात याची माहिती हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाला असायला हवी. १९९४ च्या हिरोशिमा आशियाई स्पर्धेनंतर प्रथमच हिंदुस्थानी फुटबॉल संघ एशियन गेममध्ये खेळणार नाही याचे संकेत देऊन आयओएने हिंदुस्थानी फुटबॉल संघाच्या शानदार कामगिरीचा अपमानच केल्याचा आरोप एआयएफएफने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
आयओएचे धोरण आडमुठे
हिंदुस्थानी फुटबॉल संघाने गेल्या काही वर्षात अफलातून कामगिरी करीत आपले आशियाई आणि फिफा मानांकन सुधारले आहे. हिंदुस्थानी फुटबॉल संघ ८ वर्षानंतर आशिया कपसाठी पात्र ठरलाय. शिवाय आशियाई मानांकनात १४व्या स्थानावर असणाऱ्या हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय लढतींतही शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीकडे दुर्लक्ष करून आयओए आपल्या खंडात १ ते ८ मानांकन असणाऱ्या क्रीडा संघांनाच आशियाई स्पर्धेत सहभागाच्या मंजुरीचा आडमुठा निकष घेऊन बसले आहे .हे धोरण हिंदुस्थानी फुटबॉलच्या विकासाला मारक आहे असे प्रतिपादनही एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या निवेदनात केले आहे.



























































