शरद पवारांवरून काँग्रेसमध्येच घमासान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

काँगेसचे नवे महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे यांचे स्वागत काँगेसी मंडळीने आपल्या परंपरेला जागून वादविवादाने केल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगेससोबत आघाडी करण्याबाबत दिल्लीतील काँगेस नेतृत्व सकारात्मक असले तरी शरद पवारांचा काहीही भरवसा नाही. त्यांच्यासोबत आघाडी नकोच अशी आक्रमक भूमिका नव्या प्रभारींपुढे मांडत काही काँगेस नेत्यांनी राष्ट्रवादी नकोच अशी भूमिका घेतल्याने काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही गोची झाली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारीपद खरगे यांनी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील काँगेसी नेत्यांनी बुके देऊन खरगेंचे अभिनंदन केले. त्यावेळी काँगेसी परंपरेला जागून आपापसातील मतभेदांचे प्रदर्शन घडविल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत काँगेस अध्यक्ष राहुल गांधी सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना राष्ट्रवादीशी संपर्क ठेवण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र ‘मोदी हटाओ’चा नारा देत फेडरेल फ्रंटचा नारा देणाऱ्या शरद पवारांचा कोणताही भरवसा नसल्याचा सूर काँगेसमधील एका गटाने काढला आहे. पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावरून शरद पवार कधी राजकीय कोलांटउडी मारतील याची कोणतीच शाश्वती नसल्याचे या गटाने खरगे यांच्या निदर्शनास आणून दिले. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पवारांनी आता उघडपणे विरोध सुरू केला असून तशा मुलाखती सध्या ते दणक्यात देत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास त्याचा फटका काँगेसला बसून राष्ट्रवादीच्या विस्तारास ते पोषक ठरेल अशी पुस्तीही राष्ट्रवादीविरोधक अशी प्रतिमा असणाऱ्या काँगेस नेत्याने जोडली. सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उकरून काढणारे शरद पवार ऐनवेळी राहुल गांधींना दगाफटका करणार नाहीत कशावरून? त्यामुळे काँगेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पवारांची संगत नको ही भूमिका आम्ही श्रेष्ठा पर्यंत पोहचवल्याचे या नेत्याने सांगितले.

चव्हाण विरुद्ध चव्हाण

राष्ट्रवादीसोबतच्या संभाव्य आघाडीला काँगेसमध्ये चव्हाण विरुद्ध चव्हाण असे स्वरूप प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करून पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची असल्याचे सांगितले जाते तर एकवेळ सत्ता नाही आली तरी चालेल पण राष्ट्रवादीला पुन्हा बळ द्यायला नको अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची असल्याची समजते. त्यामुळे काँगेसमध्ये आगामी काळातही या मुद्दय़ावरून दोन चव्हाणांमध्ये कलगी-तुरा रंगण्याची चिन्हे आहेत.