‘जीएसटी’चा छोट्या व्यापाऱ्यांना अद्यापि त्रास – फत्तेचंद रांका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

अनेक क्लिष्ट नियम आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’बद्दल योग्य माहिती नाही. एक वर्ष झाले तरी जीएसटीची व्यापाऱ्यांमधील भीती कायम असून, याचा सर्वाधिक त्रास छोट्या व्यापाऱ्यांनाच झाल्याचे मत पुणे व्यापारी महासंघाचे फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले.

जीएसटीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेंट्रल जीएसटी अ‍ॅण्ड सेंट्रल एक्साईज पुणे विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून फत्तेचंद रांका बोलत होते. सेंट्रल जीएसटी आयुक्त एम. व्ही. एस. चौधरी, अतिरिक्त आयुक्त राजीव कपूर, संयुक्त आयुक्त एच. के. तांतिया, विलास इंदलकर, एन. श्रीधर, सहायक आयुक्त एस. के. पाटील, सचिन घागरे, अधीक्षक यू. पी. आर. मुदलियार, निरीक्षक अमजद शेख आदी यावेळी उपस्थित होते.

फत्तेचंद रांका म्हणाले, जीएसटीतील गुंतागुंतीमुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यापेक्षा खर्डेखाशी करण्यातच जास्त वेळ जात आहे. यासाठी सोप्या पद्धतीची करप्रणाली आणली पाहिजे. राजेश पांडे, एस. श्रीधर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्मिता झा यांनी सूत्रसंचालन केले. राजीव कपूर यांनी प्रास्ताविक केले.

जीएसटी समितीत करांशी संबंधित नसलेलेच लोक

ह सरकारने जीएसटीच्या अटी आणि नियमावली ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ज्यांचा कधीही कर भरण्याशी संबंध आला नाही, अशाच लोकांचा भरणा करण्यात आला आहे. यासाठी सरकारने व्यापाऱ्यांची चर्चा करणे गरजेचे असल्याचे फत्तेचंद रांका यांनी यावेळी सांगितले.