
सामना प्रतिनिधी । जालना
सतत चारवेळा निवडून दिल्याने खासदार दानवेंची मुजोरी वाढली आहे. ही मुजोरी संपुष्टात आणण्यासाठी गाव तेथे शाखा व घर तेथे प्रहार सैनिक उभे राहणे आवश्यक असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. २५ वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून माणसाला माणूस जोडून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी सतत लढत राहून समाजसेवा करणे हाच आपला उद्देश असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी येथील विश्रामगृहात आयोजित मार्गदर्शन बैठकीत स्पष्ट केले. आपण सत्तेसाठी राजकारणात नसून, केवळ राजसत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी उभे आयुष्य व्यतीत करणार आहोत, असेही ते म्हणाले.
प्रहार संघटनेच्या आयोजित बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपापली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडावी, असे सांगून प्रत्येक गावागावांत संघटनेचे कार्य सांगितले पाहिजे. आपल्या कामाची पद्धत लोकांना समजली पाहिजे. आपण शेतकऱ्यांसह सर्व वंचित घटकांसाठी सतत काम करीत राहणे, हेच पक्ष कार्य व समाजसेवा असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
तसेच शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणाऱ्या व छातीऐवजी पायावर गोळी घालणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवेला एकदा नव्हे तर सहजपणे चारवेळा निवडून देताच कसे? असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी विचारला. तसेच सतत चारवेळा निवडून दिल्याने खासदार दानवेची मुजोरी वाढली आहे. ही मुजोरी संपुष्टात आणण्यासाठी गाव तेथे शाखा व घर तेथे प्रहार सैनिक उभे राहणे आवश्यक आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवर आपापल्या पद्धतीने आवाज उठविला पाहिजे. अपंग, शेतकरी, शेतमजूर, कामगार, निराधार महिलांचे प्रश्न, ग्रामीण व शहरी रस्ते, वीज, पाणी मूलभूत सुविधा आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार सैनिकांनी तत्पर असले पाहिजे, असेही शेवटी आमदार बच्चू कडू म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्नादोरे, प्रेमसिंग धनावत, प्रहार संघटनेचे प्रदीप शिंदे, गजानन म. देठे, शेख मुजीब, फेरोज बागवान, प्रभाकर भुसारे, सुधाकर शिंदे, सावळाहरी शिंदे, देवीदास वाघ, लक्ष्मण आणपट, हारतखेडा सरपंच नानासाहेब शेरे, बुटेगावचे सरपंच अशोक गवारे, गोविंदपूरचे सरपंच मदन जाधव, आलमगावचे सरपंच अशोक भिसे, वैâलास जिगे, इंदलकरवाडीचे सरपंच आदिनाथ इंदलकर, अकबर जहागिरदार, शे. बाबू तांबोळी, प्रदीप शिंदे आदींसह विविध संघटनांच्या कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






























































