उंडणगाव परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उंडणगाव

उंडणगाव परिसरात धुळपेरणी व मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केलेली बियाणे समाधानकारक पाऊस न पडल्याने उगवलीच नाहीत. ती कोवळी रोपे टोपणात अडकली आहेत. मका, कपाशी ही पिके वाया जाण्याची शक्यता असून दोन दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

काही प्रमाणात ज्या शेतकऱ्यांनी बियाणे पेरली आहेत, त्यांना ही बियाणे खराब तर होणार नाही ना, याची चिंता लागली आहे. लागवड केलेली बियाणे कवचमध्ये (टोपणात) अडकलेली आहेत. त्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवू नये, यासाठी शेतकरी पाऊस पडावा, अशी प्रार्थना करीत आहेत.

यंदा सुरुवातीला काही भागांत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरण्या केल्या. पाऊस हा कुठे कमी कुठे जास्त प्रमाणात पडलेला आहे. १५ जून रोजी मान्सून पाऊस पडला होता व त्यानंतर भुरभुर पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली.

धुळपेरण्या व त्यानंतर केलेल्या पेरण्यांवर दमदार पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, त्यांना पेरणी व लागवड केलेली बियाणे खराब तर होणार नाही, ना अशी चिंता लागली आहे. महागाचा बी-बियाणे विकत आणून पेरणी केलेली आहे. ते जर खराब झाले तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, हे विशेष.

आधीच बी-बियाणांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यातच दुबार पेरणीचे संकट आले तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उंडणगाव परिसरात शेतकरी पाऊस पडवा, अशी प्रार्थना करीत आहे.

चार किलोमीटरवर दमदार पाऊस

उंडणगावपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई, जळकी, हळदा या भागात समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्यावरचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे चार ते पाच किलोमीटर अंतरावर जोरदार पाऊस तर उंडणगाव परिसरात भुरभुर पाऊस झाल्याने पावसाचा लहरीपणा यावरून दिसून येत आहे.