सपशेल चुकीचा नेम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gotya movie poster

सामना ऑनलाईन । मुंबई

कुठल्यातरी खेळावरचा सिनेमा…त्यातलं राजकारण किंवा खस्ता वगैरे…आणि शेवटाकडे अटीतटीचा सामना… अशा रंगतदार, उत्कंठावर्धक सिनेमाचा साचा तसा नेहमीचाच. बॉलीवूडच काय, तर मराठीतही बराच वापरलेला. अर्थात, साचेबद्ध असलं तरीही त्यात रंगत असल्याने यापुढेही या पद्धतीचे खेळ सिनेमे येतच राहतील यात शंकाच नाही, पण मुद्दा असा आहे की, तो सिनेमा कसा काढला जातो, त्यात त्या दिग्दर्शकाची किंवा लेखकाची किंवा एकूणच सिनेमा म्हणून जे पडद्यावर दिसतं त्यात कल्पकता किती असते? कारण खिळवून ठेवणारं काहीतरी असलं की, प्रेक्षक हमखास येतोच. एवढा सगळा ऊहापोह करण्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध साचा घेऊनदेखील सिनेमा बनवणं हे गल्लीत गोट्या खेळण्याइतकं सोपं काम नाही आणि अगदी हाच विचार नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोट्या’ सिनेमा पाहताना अगदी प्रत्येक दृष्यागणिक येतो.

तर ‘गोट्या’ हा सिनेमा पहिल्या दृष्यापासून नेमका कोणत्या दिशेने जाणार आहे हे कळायला लागतं आणि या सिनेमाला तब्बल दोन तास बारा मिनिटं पाहावं लागणार आहे या कल्पनेनेच मन अस्वस्थ होते. तर ही गोष्ट आहे गोट्याची (यात दुहेरी संदर्भ आहे). म्हणजे गोट्या या मुलाची आणि गोट्या या खेळाची. इरसालवाडी या गावात गोटय़ा या मस्तीखोर मुलाचा जन्म होतो. मग नावाला जागत तो नेहमी फक्त गोट्याच खेळत असतो. सगळं गाव, शाळा, शिक्षक, पालक त्याच्या या मस्तीखोर स्वभावाला कंटाळलेले असतात आणि त्याने गोट्या खेळू नयेत म्हणून प्रयत्न करत असतात, पण त्याला गोटय़ा खेळात आपलं भवितव्य घडवायचं असतं. मग तो आणि त्याचे मित्र प्रयत्न सुरू करतात आणि या गल्लीतल्या खेळाला कुठलं स्वरूप मिळवून देतात याची काल्पनिक वजा वास्तविक, विनोदी वजा गंभीर अशी याहूनही बरंच काही असणारी कथा म्हणजे हा सिनेमा. या सिनेमाला एवढे पैलू आहेत की, काही विचारता सोय नाही. ‘गोट्या’ या सिनेमाची कथा दहा-पंधरा मिनिटांच्या कॉलेजमधल्या नाटकात शोभून दिसेल, पण त्यावरचा सिनेमा खरोखरच अपचनीय झालाय.

सुरुवातीला या गोट्याची आई औषधाची गोळी म्हणून गोटी गिळते आणि नऊ महिन्यांनी तिला मुलगा होतो तोच मुठीत ती गोटी घेऊन. म्हणून त्याचं नाव गोट्या आणि मग तो गोट्याच खेळतो. या एका वाक्यात जितक्या वेळा ‘गोट्या’ हा शब्द आलाय त्याच्या जवळपास साडेनऊ हजारपट वेळा तो सिनेमात वापरला गेलाय. एकतर त्या मुलाचं नाव आणि तो खेळ (आणि अधेमधे ‘गोट्या’ या शब्दाचा जो द्वय़र्थ आहे त्याचाही वापर). सतत ‘गोट्या’ हा शब्द ऐकून कान अक्षरश: किटायला लागतात. बरं, हा सिनेमा विनोदी बनवायचा प्रयत्न केलाय, पण ते विनोद इतके फुटकळ आणि चावून चोथा केल्यासारखे आहेत की, ते विनोदी न वाटता हास्यास्पद वाटायला लागतात. या सिनेमातले मुख्य कलाकार, लहान मुलं, इतकंच नाही, अगदी दोन मिनिटांचं काम असणारे कलाकारही अभिनयाची सुवर्णसंधी लाभल्यासारखा अभिनय सिनेमाभर करताना दिसतात. कोण हातवारे करत बोलतं, कोण किंचाळून बोलतं, कोण लंगडतच चालतं, तर कोण अजून काही…. कशाचा कशालाच ताळमेळ नाही.

आता पीटीचे शिक्षक म्हणजे राजेश शृंगारपुरे हा आता विमानातून उतरून थेट गावात आल्यासारखा वावरतो (नशीब, ‘‘मी शहरातून गावात बदली मागून घेतलीय’’ असा संवाद त्याला दिलाय), पण त्याचा भावशून्य अभिनय आणि खर्जातल्या आवाजाचा विनाकारण वापर पडद्यावर पाहणं त्रासदायक आहे.

असो. बाकी सगळय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तरीही या सिनेमाचा जो मूळ गाभा आहे. म्हणजे गोट्यांचा खेळ तो जागतिक पातळीवर नेणं वगैरे काल्पनिकतेने रचलं असलं तरी त्याला काही आगापीछा बूड, छप्पर असावं लागतं. त्या खेळाला विरोध करणारे अचानक त्याच्या बाजूने कसे वकिली करायला लागतात, अचानक इमोशनल कसे होतात, साधे पीटीचे सर गोट्या खेळातले जागतिक दर्जाचे निष्णात कोच कसे होतात हे सगळंच अनाकलनीय आहे. गोटीचा खेळ जागतिक दर्जावर न्यायचा याकडे कल्पना नावीन्य म्हणून जरी बघितलं तरी त्यात कुठेच खोली दिसत नाही. नुकताच ठरवला गेलेला हा खेळ अचानक आशियाभरातून कसा खेळला जातो आणि जगातली इतर स्पर्धक मुलं त्याच्या अनेक जागतिक स्पर्धा कशा काय खेळलेली असतात वगैरे काहीच कळत नाही.आणि मुख्य म्हणजे जो खेळ आहे तो तर दिसतच नाही. मुलं गोट्या मारतात आणि त्यांचे हरतात, आपले जिंकतात अशी घडवलेली कथा कशी पचनी पडू शकेल. एकूणच साचेबद्ध सिनेमातही नावीन्य पाहिजेच. तोचतोपणा, फुटकळ विनोद, सपाट पटकथा, पाचकळ संवाद, सुमार अभिनय या शिदोरीवर इतर कुठली स्पर्धा सोडा, पण साधा सिनेमाही प्रेक्षकाचं मन जिंकू शकत नाही हेच खरं!

  • दर्जा – अडीच *
  • सिनेमा – गोट्या
  • निर्माता – जय केतनभाई सोमय्या
  • दिग्दर्शक/लेखन – भगवान वसंत पाचोरे
  • संगीत – अवधूत गुप्ते
  • कलाकार – ऋषीकेश वानखेडे, राजेश शृंगारपुरे,
    सयाजी शिंदे, आनंद इंगळे,
    कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची,
    शशांक दरणे