अनधिकृत कृषी विद्यापीठाला अभय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagpur-vidhan-bhavan

सामना प्रतिनिधी । अक्कलकोट

अक्कलकोट येथे राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. हे विद्यापीठ अनधिकृत असल्याचे स्पष्ट झालेले असतानादेखील याबाबत कृषी परिषदेकडून गुन्हा नोंदवलेला की पोलिसांनी चौकशी केली नसल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक सुरूच असल्याची धक्कादायक माहिती लेखी उत्तरातून समोर आली आल्याने अशा संस्थांना अभय मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर जिह्यातील अक्कलकोट येथे तडवल रोडवर राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ सुरू असल्याबद्दल आमदार किरण पावसकर, हेमंत टकले, नरेंद्र पाटील यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यास कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांनी लेखी उत्तर दिले.

अक्कलकोट येथे अनधिकृत कृषी विद्यापीठ सुरू असल्याची तक्रार कृषी परिषदेस प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला प्राधिकारी म्हणून अधिसूचित केले आहे. परिषदेच्या संचालकांनी अनधिकृत संस्थेवर कारवाई करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांचे अधिष्ठाता यांना प्राधिकृत केले आहे. या प्रकरणात कोणतीही तक्रार अथवा गुन्हा कृषी परिषद अथवा विद्यापीठाने दाखल केला नाही. तसेच पोलिसांकडून चौकशी झाली नाही.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचा अहवाल कृषी परिषदेकडे प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठातील शिक्षण हे अवैध आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक करणारे असल्याने या संस्थेवर गुन्हा दाखल करणे योग्य राहील असा अहवाल दिला आहे. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र कृषी, पशु व मत्स्य विज्ञान अभ्यास पाठय़क्रम अधिनियम २०१३ च्या तरतुदीनुसार समक्ष प्राधिकारी यांना ३० जूनला पत्राद्वारे सूचना दिली आहे.