कुलदीपचे अपयश हेच पराभवाचे मुख्य कारण – विराट कोहली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
virat-kohli-3

सामना ऑनलाईन । कार्डिफ

मँचेस्टर टी-२० तील शानदार विजयानंतर कार्डिफच्या लढतीत टीम इंडियाला इंग्लंडकडून ५ विकेट्सनी पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे सलग ६ सामने जिंकून टी -२० विजयाचा षटकार नोंदवण्याचे हिंदुस्थानचे स्वप्न भंगले आहे. कार्डिफच्या लढतीत ‘चायनामन’ कुलदीप यादव आपला प्रभाव पडू शकला नाही. त्याचे अपयश हेच आमच्या पराभवाचे मुख्य कारण असल्याचे हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली याने लढतीनंतर सांगितले. यजमान संघाचे फलंदाज १५० धावांचा पाठलाग करताना छान खेळले हे मान्य करावेच लागेल, असेही विराट म्हणाला.

हिंदुस्थानचे शिखर धवन (१०) ,रोहित शर्मा (५) आणि लोकेश राहुल (६) या आघाडीच्या फलंदाजांचे अपयश हेही टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याचे सांगत कर्णधार विराट म्हणाला, इंग्लिश फलंदाजांनी कुलदीप यादवच्या गुगली आणि चायनामन चेंडूंचा चांगलाच होमवर्क करून मैदानात उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच कुलदीप अपयशी ठरला. अन्यथा १४९ धावांचा बचाव करत विजय मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो असतो. अर्थात तिसऱ्या टी -२० त आम्ही पुन्हा यशाला गवसणी घालू असा विश्वास विराटने व्यक्त केला.

उमेशने दिलेला चौकार महाग पडला

”लढतीचे १९वे शतक टिच्चून करीत असलेल्या उमेश यादवने शेवटच्या चेंडूवर दिलेला चौकार आम्हाला बॅकफूटवर घेऊन गेला,” असे मत व्यक्त करीत विराट म्हणाला, ”उमेशने या लढतीत स्तुत्य असा वेगवान मारा केला, पण टी -२० क्रिकेट हे गोलंदाजांसाठी दुष्टच असते त्याला तो बिचारा तरी काय करणार. कालची लढत तुल्यबळ ठरली. पण यजमान संघ आमच्यापेक्षा सरस ठरला हे मात्र खरे आहे.”