नांदेड शहरात चार दिवसांच्या ऐवजी एक दिवसाआड पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी, नांदेड

विष्णूपुरी जलाशयात ४० टक्के पाणीसाठा निर्माण झाल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली असली तरी तांत्रिकदृष्ट्या ही बाब खूपच अशक्य असल्याने फिलगूडच्या या काँग्रेस महापालिकेच्या घोषणेने सर्वसामान्यांची फसवणूकच झाली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने काही नगरसेवकांच्या अट्टाहासापोटी व काँग्रेसच्या चर्चेतील नगरसेवकांच्या दबावापोटी उद्या सोमवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या ही बाब पूर्णतः अशक्य असून, नांदेड येथून बदलून गेलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर घोषणा म्हणजे नांदेडकरांसाठी एप्रिल फूल असल्याचे म्हंटले आहे. विष्णूपुरी जलाशय शंभर टक्के भरला तरी नांदेडला एक दिवसआड काय, दोन दिवसआडही पाणीपुरवठा होऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नांदेडला कोटतीर्थ येथील विष्णूपुरी प्रकल्पाच्या पंपगृहातून पाणी पुरवठा होतो आणि सिडको, डंकीन, काबरानगर, असदवन येथील जलशुद्धीकरण केंद्रात विविध मोटारीव्दारे पाठविला जातो. तिथे पाण्याचे शुद्धीकरण होते व त्यानंतर हे पाणी नांदेडच्या विविध भागात वितरीत केले जाते. काबरानगर येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून ६० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण होऊन शहरात वितरीत केले जाते. या जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या ५० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. मात्र कोटतीर्थ मधून होणारा पाणीपुरवठा हा अल्प असल्याने काबरानगरच्या जलशुद्धीकरणाची सर्व मदार ही आसना नदीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आहे. आसनेला पाणी असेल तरच या जलशुद्धीकरण केंद्राचा पुरेपूर वापर होऊ शकतो. मात्र वर्षातील केवळ तीन महिने आसनामधून पाणी मिळते. सिडको, कौठा, देगलूर नाका आणि जुन्यामोंढ्याच्या काही भागात डंकीन आणि असदवनच्या जलशुद्धीकरणातून पाणी शहराला उपलब्ध होते. कोटतीर्थ येथून चालू असलेल्या चार मोटारींमार्फत विष्णूपुरी प्रकल्पातील पाणी उपसले जाते. मात्र खालच्या पातळीवर त्याचे नियोजन होत असताना त्याचा ताळमेळ नसल्याने वर्षातील आठ महिने नांदेडकरांना तीन दिवसाआड पाणी मिळते. तर उन्हाळ्यामध्ये नांदेड उत्तरेच्या ९० टक्के भागात चार दिवसाआड पाणी मिळते.

सिडको, जुनामोंढा भागात पावसाळ्यात दोन दिवसाआड पाणी उपलब्ध होत असते. प्रशासनाने कितीही कसरत केली तरी नांदेडकरांना एक दिवसाआड पाणी मिळणे अशक्य आहे. आयुक्तांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार विष्णूपुरीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आल्याने नांदेडकरांना एक दिवसआड पाणी मिळू शकेल व त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे म्हटले आहे. सध्या नांदेड उत्तर भागात चार दिवसाआड पाणी नागरिकांना उपलब्ध होत आहे.. त्यात वीज पुरवठा खंडित होणे, पाईपलाईनचे काम, दुरुस्तीचे काम अशा अनेक अडचणींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता काही हौशी नगरसेवक व मोजक्या काँग्रेस नगरसेवकाच्या दबावामुळे फिलगूडची ही घोषणा मनपा प्रशासनाला करावी लागली, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शक्यच नाही, अशी दबक्या आवाजात प्रशासनातील अधिकाऱ्यांचीच चर्चा होत आहे.