पुन्हा गँगवारचा भडका, सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना प्रतिनिधी । सोलापूर

शहरात पत्रा तालमीतून वाढलेला गँगवार पुन्हा भडकला असून, नवी पेठेतील मोबाईल गल्लीत सत्यवान ऊर्फ आबा कांबळे या तरुणाचा पाठलाग करून भररस्त्यात कोयत्याने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे रविवारी नवी पेठेतील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. व्यापारी दहशतीखाली असून, येथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

सत्यवान ऊर्फ आबा कांबळे (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. तौसिफ गुड्डूलाल विजापूरे (रा. मेहताबनगर, शेळगी), गणेश ऊर्फ अभिजित चंद्रशेखर शिंदे (रा. मुरारजी पेठ, निराळेवस्ती), रविराज दत्तात्रय शिंदे (रा. शाहीरवस्ती, भवानीपेठ), प्रशांत ऊर्फ अप्पा पांडुरंग शिंदे (रा. शाहीरवस्ती), सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू शिंदे (पाणीवेस), विनीत कोणारे (रा. पुणे) यांना अटक करण्यात आली असून, नीलेश प्रकाश महामुनी हा फरार आहे.

सत्यवान हा आपल्या मोबाईल दुकानामध्ये बसलेला असताना कोयत्यासारखे हत्यार घेऊन आलेल्या एका टोळीने अचानकपणे हल्ला केला. दरम्यान, मारेकऱयांच्या हातातून निसटण्यासाठी आबा कांबळे हा पळ काढत असताना या टोळीने भररस्त्यात गाठून त्याच्यावर कोयत्याने जबर वार केले. यामुळे आबा कांबळे जागीच कोसळला. हा थरार सुरू असतानाच मोबाईल गल्ली व नवी पेठेतील व्यापाऱयांनी भीतीने दुकाने बंद केली. या हत्येनंतर आरोपींनी हत्यारे तिथेच टाकून पळ काढला. या हत्येची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

सोलापुरात पूर्वीपासून तालमीतले गँगवार पोसण्यात आले आहे. आबा कांबळे हा पत्रा तालीममधील कार्यकर्ता आहे. २००४ साली पाणीवेस तालीम येथील कार्यकर्ता ऋतुराज शिंदे याचा अशाच पद्धतीने निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात आबा कांबळे हा आरोपी होता. सोलापूर न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली होती, तर २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले होते. याप्रकरणी शुभम धळराव याने फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यात पाणीवेस तालीमचे गामा पैलवान ऊर्फ सुरेश शिंदे, रविराज शिंदे यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाजणांना अटक करण्यात आली आहे. फौजदारी चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.