जमावाने केलेल्या हल्ल्यांची सरकारकडे नोंदच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांतील दोन प्रकारच्या घटनांनी देश हादरला आहे. पहिला प्रकार म्हणजे जमावाने संशयावरून किंवा अफवांवरून केलेले हल्ले आणि दुसरा प्रकार म्हणजे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार. जमावाने केलेल्या हल्ल्यात किती जण ठार झाले याची आकडेवारी सरकारी यंत्रणांकडे नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या मते २०१७ ची आकडेवारी जेव्हा जाहीर होईल त्यामध्ये मॉब लिंचिंगच्या घटनांची आकडेवारी असेल. गेल्या १५ वर्षांत अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर १७०० टक्के वाढ झाली आहे.

१२ राज्यांमध्ये २००० ते २०१२ या १२ वर्षांच्या काळात डाकीण ठरवून जमावाने २०९७ जणांची हत्या केली आहे. जानेवारी २०११ ते जून २०१७ या काळात मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये २० टक्के वाढ आहे. गोहत्येच्या अफवेवरून २०१७ पहिल्या सहामाहीत २०हल्ले झाले. देशभरातील १० राज्यांमध्ये २०१८ साली जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची १४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३१ जण मरण पावले आहेत. यापैकी ११ प्रकरणे तर मूलचोरीच्या संशयाची होती. अशा प्रकरणांची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. क्राइम इन इंडिया २०१७ पब्लिकेशनमध्ये पहिल्यांदा अशा नोंदीचा समावेश केला जाणार असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने सांगितले आहे.

२००२ पासून सुरुवात

२००२ मध्ये सर्वात पहिले प्रकरण हरयाणा येथून समोर आले. गोहत्येच्या अफवेवरून संतप्त जमावाने पाच दलितांना मोठी मारहाण करून ठार केले. तीच अफवा मुजफ्फरनगर आणि कोकराझार येथील दंगलीचे कारण बनली. अशा प्रकारच्या सर्वाधिक घटना गोवंश हत्या प्रतिबंध कायदा लागू झाल्यानंतरच घडल्या आहेत. २०१० ते २०१७ या काळात ६३ गुन्हे नोंदवले आहेत.

तीन मोठ्या अफवा

– डाकीण समजून जमावाने ठार केल्याच्या घटना
– गोहत्येच्या अफवांचे प्रमाणही जास्त
– गेल्या काही दिवसांत मूलचोरीच्या आरोप ठेवून जमावाने निरपराध्यांना ठार केल्याच्या घटनाही वाढल्यात

अल्पवयीन मुलांवरील अत्याचारात १७०० टक्क्यांनी वाढ

– एनसीआरबीच्या मते, अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना २०१५ ते २०१६ या वर्षांत ८२ टक्क्यांनी वाढल्या.
– २०१५ मध्ये अशा १०८५४ घटना घडल्या तर २०१६ मध्ये १९७६५ घटना घडल्या.
– २०१६ मध्ये बालतस्करीचे १४१८३ प्रकरणे समोर आली आहेत. २०१५ च्या तुलनेत ही वाढ २७ टक्क्यांनी जास्त आहे.
– २०१६ हरवलेल्या ६३,४०७ मुलांपैकी ४१ हजार ६७ फक्त मुली होत्या. हरवलेल्या मुलींचे प्रमाण ६५ टक्के होते. ४५ टक्के मुलांना जबरदस्तीने मजूर बनवण्यात आले. ३५ टक्के मुलींना लैंगिक शोषणासाठी विकण्यात आले.४,९८० मुली शरीरविक्री आणि पोनोग्राफीमध्ये ढकलण्यात आले.

मध्य प्रदेशात सर्वाधिक अत्याचार

मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलांवर सर्वाधिक अत्याचार झाल्याची नोंद आहे. २०१६ मध्ये मध्य प्रदेशात २४६७ तर महाराष्ट्रात २२९२ घटना घडल्या होत्या. उत्तर प्रदेशात २,११५, ओडिशात १२५८, तामीळनाडूत ११६९ घटनांची नोंद आहे. जम्मू-कश्मीरमध्ये २०१५ मध्ये अशा प्रकारची एकही घटना घडली नव्हती, मात्र २०१६ मध्ये अशा २१ घटनांची नोंद आहे. हरयाणा राज्य महिला आणि मुलांसाठी असुरक्षित ठरले आहे. हरयाणात २०१५ मध्ये २२४ गुह्यांची तर २०१६ मध्ये ५३२ गुह्यांची नोंद झालेली आहे. गुजरातमध्ये २०१५ मध्ये १०५९ आणि २०१६ मध्ये १,१२० घटनांची नोंद झाली आहे.

– २००१ साली अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांची २०१३ प्रकरणे समोर आली. २०१६ मध्ये हा आकडा ३६ हजार २२ इतका झाला. म्हणजे तब्बल १७०० टक्क्यांची वाढ. २०१७ आणि २०१८ मधील आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.