११९ पोलीस अधिकाऱ्यांची नापास होण्याची हॅटट्रिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

पोलीस दलात निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष सेवेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षेत हैदराबादच्या १२२ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांपैकी ११९ जण नापास झाले आहेत. हे अधिकारी एकदा नव्हे तर तब्बल तीनवेळा संधी देऊनही उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमीत निकाल बघून सारेच हैराण झाले आहेत. सध्यातरी नापास होऊनही सर्व अधिकाऱ्यांना पदवी देण्यात आली असून वेगवेगळ्या कॅडरमध्ये प्रोबेशनवर ठेवण्यात आले आहे.

हैदराबादच्या पोलीस अकादमीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले असून सर्वाधिक नापास प्रशिक्षणार्थींची नोंद झाली आहे. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमीत प्रशिक्षणार्थी नापास होतात, मात्र एवढय़ा संख्येने एकगठ्ठा नापास होण्याचे प्रकरण याच वर्षी घडले आहे. २०१६ मध्ये फक्त दोन आयपीएस अधिकारी अकॅडमीत पास होऊ शकले नव्हते. मात्र या वर्षी फॉरन पोलीस फोर्सचे मिळून एकूण १३६ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी १३३ अधिकारी एक किंवा अधिक विषयांत नापास झाले आहेत. यामध्ये इंडियन पीनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड या विषयांचा समावेश आहे. गेल्या वर्षी पासिंग आऊट परेडमध्ये पदक आणि चषक मिळवणारे अधिकारीही नापास झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. फॉरन पोलीस दलाचे सर्वच अधिकारी नापास झालेत. सर्वजण पुन्हा एकदा परीक्षेला बसणार आहेत.

– २००६ बॅच – १३४ प्रशिक्षणार्थी अधिकारी नापास. यामध्ये भूतान, मालदिव आणि नेपाळच्या १७ अधिकाऱ्यांचा समावेश.

-आयपीएस प्रशिक्षणार्थींनी इव्हिडंन्स ऍक्ट, आयपीसी, सीपीसी, फॉरेन्सिक सायन्स, फॉरेसिंक मेडिसीन ऍण्ड आयपीसी, फॉरेसिंक ऍण्ड इन्व्हेस्टिगेशन या विषयांसह शस्त्रास्त्र हाताळणे, पोहणे, घोडेस्वारी, फिल्ड क्राफ्ट, ड्रिल या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहेत.

– ९० टक्के प्रोबेशनर एक वा एकापेक्षा अधिक विषयांत नापास, फक्त ३ प्रोबेशननर सर्व विषयांत उत्तीर्ण.

– कायदा आणि सुव्यवस्था तसेच अंतर्गत सुरक्षा या विषयावर सर्वाधिक प्रशिक्षणार्थी नापास.

– पदक जिंकणारे प्रशिक्षणार्थीही नापास