
सामना ऑनलाईन । नागपूर
अधिवेशनाच्या काळात विधीमंडळाच्या आवारात पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. पास नसतानाही आत जाण्यासाठी गेटवर गर्दी केली जाते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विधीमंडळाच्या शिष्ठमंडळांनी मंत्र्यांची भेट ही त्यांच्या बंगल्यावरच घ्यावी. तसेच आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधीमंडळाच्या आवारात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी पोलीसअधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विविध भागातून येणा शिष्ठमंडळांची वेळ चुकल्यास मोठी गोची होणार आहे.
याबाबत सोमवारी सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदेत निवेदन करून या निर्णयाची माहिती सभागृहाला दिली. मंत्री आणि आमदारांचे स्वीय सहाय्यक यांनाच विधीमंडळाच्या आत प्रवेश देण्यात यावा. कार्यकर्त्यांना पास नसेल तर त्यांना आत प्रवेश मिळणार नाही. मंत्र्यांना भेटायला येणाऱ्या शिष्ठमंडळाने मंत्र्यांची भेट त्यांच्या बंगल्यावर जाऊन घ्यावी, तेथेच बैठक घ्यावी. तसेच विधीमंडळाच्या आत असलेल्या उपहारगृहातील कामगारांचा फोटो पास व पोलिसांची एनओसी घ्यावी. आत येणाऱ्या पदार्थांची तपासणी करून घ्यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयामुळे शिष्ठमंडळांना सकाळी लवकर मंत्र्यांचा बंगला गाठावा लागणार असून, तेथील भेट टळल्यास मंत्री महोदय पुन्हा बंगल्यावर येण्याची वाट पहावी लागणार असल्याने मोठी आडचण होण्याची शक्यता आहे.
अधिवेशन सुरू झाल्यापासून विधीमंडळाच्या आवारात एका आमदारांसोबत अनेक जण प्रवेश करत आहेत. अनेक जण नेत्यांसोबत सेल्फी काढतानाचे चित्र पहायला मिळत आहे. अध्यक्ष आणि सभापतींनी घेतलेल्या निर्णयामुळे विधीमंडळातील गर्दी कमी होणार आहे.




























































