
सामना प्रतिनिधी, नागपूर
‘सीबीएसई’ बोर्डातून बारावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या केंद्रीय बोर्डाच्या शाळांत एचएससी बोर्डापेक्षा अधिक गुण देण्यात येतात. यामुळे पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी एचएससी बोर्डाचे विद्यार्थी मागे पडत असून हे रोखण्यासाठी ‘सीबीएसई’प्रमाणेच ‘एचएससी’ बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण मिळावेत यासाठी सरकारने गुण समानीकरण सूत्र राबवावे अशी मागणी शिवसेनेने केली असता याबाबत शिक्षणतज्ञांचा सल्ला घेऊन दिवाळीपर्यंत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सीबीएसईच्या गुण पद्धतीमुळे बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेत एचएससी बोर्डाचे विद्यार्थी मागे पडत असल्याची बाब लक्षवेधीद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणली. ते म्हणाले, केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये जास्त गुण देण्यात येत असल्याने त्यांना महाविद्यालयांत चांगल्या अभ्यासक्रमासाठी सहज प्रवेश मिळतो. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा सेल्फ फायनान्स कोर्सकडे असल्याने अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱया एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण जाते. त्यामुळे दहावीतून अकरावीत प्रवेश घेताना ज्याप्रमाणे सीबीएसई आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी गुण समानीकरण सूत्र राबवले जाते तसेच गुण समानीकरण सूत्र सरकारकडून राबविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना भाषेचे दोन विषय असतात तर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना केवळ एकच विषय असतो. यामुळे गुणांमध्ये फरक पडण्याची शक्यता असून एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी भूमिका मांडली.
शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला घेणार
यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, एसएससी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाची काठीण्य पातळी तपासण्यात आल्यानंतर शिक्षणतज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार बेस्ट ऑफ फाइव्हचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणेच सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण ५०० असतात तर एचएससी बोर्डाचे ६५० असतात. त्यामुळे या गुणांचा प्रवेशप्रक्रियेवर काही परिणाम पडतो का, तसेच यांच्याही काठीण्य पातळीत काही तफावत आहे का हे शिक्षणतज्ञांचा सल्ला घेऊन ठरविले जाईल. याविषयीचा निर्णय दिवाळीपर्यंत घेतला जाईल, असे सांगितले.



























































