
सामना प्रतिनिधी, मुंबई
कोकणातील नाणार येथे होऊ घातलेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणच्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही. येथील स्थानिक जनतेच्या भावना तीव्र असून हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करणारा औचित्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करू न दिल्याने शिवसेना आमदार आक्रमक झाले. ‘रद्द करा रद्द करा, नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करा’ अशा घोषणा देत आमदारांनी सभागृह दणाणून सोडले. मात्र तरीही बोलण्याची परवानगी न मिळाल्याने शिवसेना आमदार राजन साळवी आणि प्रताप सरनाईक यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळात सभागृहाचे कामकाज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी तहकूब केले.
नाणार येथील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथेच अडविण्यात आल्याने नागरिकांनी तिथेच धरणे सुरू केले. नाणार रिफायनरीला विरोध करण्यासाठी आलेल्या स्थानिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शिवसेना आमदार राजन साळवी यांनी सभागृहात याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. यावेळी पीककर्जावरील २९३च्या प्रस्तावाचे उत्तर लांबल्याने आता हे उत्तर होऊ द्या मग बोलू देतो अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या.
सभागृहातील आँखो देखा…
नाणारविषयी स्थानिकांच्या भावना तीक्र असून औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र याला परवानगी न मिळाल्याने शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार राजन साळवी, अजय चौधरी, सुनील शिंदे, वैभव नाईक, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, प्रकाश फातर्पेकर, चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांच्यासह सर्वच शिवसेना आमदारांनी वेलमध्ये धाव घेतली. ‘रद्द करा रद्द करा, नाणार प्रकल्प रद्द करा’ अशा जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या गोंधळात चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेना आमदारांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र, परवानगी न मिळाल्याने शिवसेना आमदार अधिक आक्रमक झाले सर्व आमदार वेलजवळ जमा झालेले असतानाच आमदार राजन साळवी आणि प्रताप सरनाईक अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहोचले.
आमदारांनी राजदंडाला हात घातला. यावेळी चोपदाराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनीही राजदंड सोडण्यास विरोध केला. यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळात सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये २००हून अधिक कोकणवासीय सहभागी झाले होते.
विधानभवनाबाहेर शिवसेना आमदारांचा मोर्चा
विधानभवनाबाहेर पडताच शिवसेना आमदारांनी जोरदार मोर्चा काढला. नाणार रिफायनरी येऊ देणार नाही, शिवसेना प्रकल्प होऊ देणार नाही. नाणार रिफायनरी रद्द करा, रद्द करा, अशा जोरदार घोषणा देत सर्व आमदार या मोर्चात सहभागी झाले. शिवसेनेच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला.
शिवसेना आमदारांनी घेतली नाणारवासीयांची भेट
कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज विधान भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये २००हून अधिक स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम येथे धरणे धरलेल्या या आंदोलकांची शिवसेना आमदारांनी भेट घेतली. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, नीलम गोऱ्हे, स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे सर्व आमदार या ठिकाणी पोहोचले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी कोणत्याही परिस्थितीत विनाशकारी नाणार प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो शब्द नाणारवासीयांना दिला आहे. त्या शब्दाबाहेर कुणी जाणार नाही. आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार तुमच्या पाठीशी उभे राहून विनाशकारी प्रकल्पाला तीव्र विरोध करू, असे आश्वासन त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. तर नीलम गोऱ्हे यांनी जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, असे प्रकल्पग्रस्तांना सांगितले.
शिवसेनेचा आवाज बंद होणार नाही – राजन साळवी
कोकणात रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. या प्रकल्पाबाबत आम्ही जनतेशी चर्चा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कोकणात यावे. येथील जनतेने प्रकल्पाला पाठिंबा दिला तर आमचे काही म्हणणे नाही. पण ज्या दिवशी तुम्ही कोकणात याल तेव्हा तेथील जनता कोकणात पाऊल ठेवू देणार नाही. कोकणात आतापर्यंत ३७ प्रकल्प होऊ घातले आहेत. या प्रकल्पात एनराँन, जिंदाल, फिनोलेक्स, जैतापूर आहे, त्याच्या लगत दोन किमी अंतरावर हा नाणार प्रकल्प होऊ घातलेला आहे. या विनाशकारी प्रकल्पांमुळे आंबा बागायतदार, शेतकरी व मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून प्रकल्पाला स्थानिक जनतेचा शंभर टक्के विरोध आहे आणि शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी ठामपणे ठामपणे उभी आहे. यावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यास अध्यक्षांनी मला परकानगी न दिल्यानेच नाईलाजाने आम्हाला त्यांच्या आसनापर्यंत जाण्याची वेळ आली. आज सभागृह बंद केले तरी शिवसेनेचा आवाज कुणी बंद करू शकत नाही, असे साळवी म्हणाले.
औचित्याचा मुद्दा उपस्थित करणे हा अधिकार – सुनील प्रभू
शिवसेनेचे मुख्य प्रतोद व आमदार सुनील प्रभू म्हणाले की, कोकणातून नागपूरला आलेल्या मोर्चाची माहिती सभागृहाला देण्यासाठी स्थानिक आमदार राजन साळवी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी परवानगी मागितली. पण परवानगी दिली नाही औचित्याचा मुद्दा मागणे हा नियमावलीनुसार सदस्याचा अधिकार आहे. तो अधिकार डावलला म्हणून शिवसेना आक्रमक झाली, असे प्रभू म्हणाले.
नाणार प्रकल्प आमच्या परिसरात नको यासाठी रत्नागिरी जिह्यातील नाणार गावातील रहिवाशांनी नागपुरातील यशवंत मैदानावर धरणे आंदोलन धरले होते. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांसमोर शिवसेनेची ठोस भूमिका आणि मुद्दे मांडले.
माधव गाडगीळ समितीने हा परिसर इको सेन्सेटिव्ह म्हणून घोषित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नाणार प्रकल्प लादणार नाही असे स्पष्ट केले, तसेच पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत रिफायनरी प्रकल्प हा हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवर उभारता येऊ शकतो. त्यामुळे तो नाणारच्या जनतेवर लादणार नाही असे स्पष्ट केले होते. सुभाष देसाई यांनी नाणार येथील जमीन अधिग्रहण थांबविण्यात यावे याबाबत ठराव दिला, तोदेखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. शिवसेना कोकणवासीयांसोबत आहे हे पाहिल्यानंतर शिवसेननेवर टीका करणाऱ्यांची तेंडेही बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. रायगड सेझ, पुणे दाऊ प्रकल्प रद्द केले तसा नाणारही रद्द करू, शिवसेना स्थानिक नागरिकांच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली आहे. आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.




























































