
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यात गेल्या वर्षी २ हजार १०० पुलांचे ऑडिट करण्यात आले असून ज्या भागात धोकादायक पूल आहेत तेथे तत्काळ नवीन पुलाची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. नाशिक जिह्यातील इगतपुरी तालुक्यातील असवली स्टेशनजवळील ब्रिटिशकालीन दगडाची दुरवस्था झाली असून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलाला हादरे बसतात. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे का, असा प्रश्न आमदार राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित केला. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला. राज्यातील पुलांचा स्थितीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पोटे-पाटील म्हणाले की, इगतपुरीजवळील या पुलाची उंची जास्त असल्याने कंपने जाणवत आहेत. या पुलाचे ऑडिट झाले असून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामास मार्च २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याला तांत्रिक मंजुरी बाकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अतिधोकादायक पुलांच्या बांधणीचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे सांगितले.
























































