
सामना प्रतिनिधी । मुंबई
वयोवृद्ध मातापित्यांचा सांभाळ करणाऱया मुलांना आयकरात (इन्कम टॅक्स) सूट देण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारला केली जाणार आहे. राज्याच्या वित्त खात्याकडून ही शिफारस केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादाही ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात काढलेल्या अध्यादेशात ही माहिती देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण योजना राबवण्याचे निर्देशही सर्व खात्यांना देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असतील तर स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱयाने एखाद्या समाजसेवकाला घेऊन महिन्यातून एक वेळ त्यांच्या घरी जावे आणि त्यांची विचारपूस करावी असे या अध्यादेशात नमूद आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन मदत पुरवता यावी म्हणून जिल्हास्तरावर हेल्पलाइन सुरू करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा मिळावी, चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठीही संबंधित विभागांना योजना राबवण्यास सांगण्यात आले आहे. शासकीय मेडिकल कॉलेज रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांवर उपचारासाठी ५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आखलेले हे धोरण २०१३ मधील आहे, परंतु त्याची अंमलबजावणीच झाली नव्हती.





























































