
विजय जोशी, नांदेड
शासकीय कंत्राटदार सुमोहन राममोहन कनगला यांच्या आत्महत्येप्रकरणी नांदेडमधील बडं प्रस्थ असलेल्या उद्योगपती चंद्रकांत गव्हाणे यांना अटक करण्यात आली आहे. सुमोहन यांनी बुधवारी संध्याकाळी पिस्तुलाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. सुमोहन यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, या चिठ्ठीध्ये गव्हाणे यांच्यासह हैद्राबाद मधील बाला रेड्डी आणि विनोद रेड्डी तसेच भुवनेश्वर येथील जितेंद्र गुप्ता यांची नावे लिहली होती. या चौघांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं सुमोहन यांनी लिहून ठेवलं होतं.
चंद्रकांत गव्हाणे, सुमोहन कनगाला, सलीम उद्दीम अहमद आणि संजय पैकम यांनी मिळून एक कंपनी स्थापन केली. या कंपनीत कनगला यांना इतर आरोपींनी २.५ कोटी गुंतवण्यास सांगितले व इतर आरोपी उर्वरित ५० टक्के गुंतवणूक करणार होते. परंतु आरोपींनी गुंतवणुकीचे पैसे दिलेच नाही. जेव्हा कंपनीतील नफा देण्याची वेळे आली तेव्हा गव्हाणे यांनी हात वर केले. तसेच बाला रेड्डी यांच्याकडूनही ८० लाख रुपये येणे होते, गव्हाणे यांनी तगादा लावूनही रेड्डींनी ते पैसे परत दिले नाही. गव्हाणे आणि कनगाला हे चांगले मित्र होते. मैत्रीच्या विश्वासात कनगाला यांनी गुंतवणूक केली, पण मित्रानेच पैसे बुडवले. हे पैसे न मिळाल्यामुळे कनगाला तणावात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी ३ पानी चिठ्ठी लिहिली. आई मला माफ कर असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले व आपल्या आत्महत्येला हे आरोपी जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट नमूद केले.
सुमोहन कनलगा यांच्या आई सीताभाभी या शास्त्रिया गायिका म्हणून शहरात सुप्रसिद्ध आहेत. तसेच त्या गायनाचे धडेही देतात. सायंकाळी तळमजल्यावर त्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. आपल्या आईंना सुमोहन यांनी बाय बाय केला आणि दुसर्या मजल्यावर गेले. सुमोहन बाहेर चालले आहेत असे समजून आईंनी फार गांभीर्याने घेतले नाही. पण दुसर्या मजल्यावरील सुमोहन यांनी आपल्या बेडरुममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. सुमोहन यांनी आत्महत्या केल्याचं कळताच अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उप अधीक्षक अभिजित फस्के,भाग्यनगरचे पोलीस पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

























































