मराठी कवितेचा नवा पत्ता…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुभाष पवार

एखादा कार्यक्रम सुरू करणं फार सोपं असतं, पण त्यात सातत्य टिकवणं आणि पहिल्या प्रयोगाला ठरवलेली ध्येयं व तत्त्वं सांभाळत एकेक पाऊल पुढे टाकणं ही फार कठीण गोष्ट असते. ‘मु.पो.कविता’ने आजवर हे शिवधनुष्य पेलून मराठी कविता रसिकांपर्यंत पोहचविण्याचा दर्जेदार प्रयत्न सातत्याने चालू ठेवला आहे.

कविसंमेलन म्हटलं की, अलीकडच्या काळात आपल्याला काय आठवतं? एक मंच, त्या मंचावर असलेली कवींची गर्दी आणि पुढे ऐकायला अत्यंत तुरळक संख्येने उपस्थित असलेला रसिक वर्ग. कविसंमेलनाचं हे चित्र बदलण्याच्या उद्देशाने व मराठी भाषेतली जुन्या-नव्या पिढीची कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने काही तरुणांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी ‘अष्टगंध’ ही कला संस्था स्थापन केली आणि या संस्थेने ‘मु.पो.कविता’ नावाचा काव्य वाचनाचा एक नवाकोरा कार्यक्रम मराठी रसिकांसमोर आणला.

१४एप्रिल, २०१५ रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह इथे या कार्यक्रमाचा पहिलावहिला प्रयोग झाला आणि हळूहळू बोरिवली, दादर, ठाणे, वसई, विरार, वाडा, डोंबिवली ते थेट नाशिकपर्यंत मिळून गेल्या दोन-तीन वर्षांत या कार्यक्रमाचे तब्बल २५ प्रयोग झाले. मराठीतले ज्येष्ठ कवी आणि त्याचबरोबर नव्या पिढीतले अनेक दर्जेदार कविता लिहिणारे तरुण कवी यांच्या दर्जेदार कविता सादर करत मु.पो.कविता या कार्यक्रमाचे आजवर तब्बल पंचवीस प्रयोग सादर झाले. या कार्यक्रमातून आजवर थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल १०० कवींनी आपल्या कविता सादर केल्या. एखाद्या कविसंमेलनाला नेपथ्य, प्रकाश योजना असू शकते का ? या प्रश्नाला छेद देत उत्तम नेपथ्य, रंगमंच व्यवस्था व प्रकाश योजना करून मु.पो. कविता कार्यक्रमाने आजवर अनेक नवनवे रसिक मराठी कवितेशी जोडले.

कार्यक्रमात तोचतोचपणा येऊ नये व रसिकांना सतत काहीतरी नवे देता यावे या उद्देशाने कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या कवितांवर ‘कविता लोभसवाणी’ तर कवी भगवान निळे यांच्या कवितांवर ‘एका कवीच्या दुःखाचे भाषांतर’ असे दोन आगळेवेगळे कार्यक्रम रसिकांना दिले. या प्रयोगाला कविवर्य अशोक बागवे, नाटककार प्रेमानंद गज्वी, कवी किशोर पाठक यांनीही मनःपूर्वक दाद दिली. याशिवाय कवी प्रशांत मोरे यांना घेऊन वाशी येथे ‘तरन्नुम कविता विशेष’ तर ठाणे येथे वैभव जोशी यांच्याशी गप्पा व त्यांच्या कवितेचा एकूण प्रवास उलगडणारा अविस्मरणीय प्रयोग सादर केला.

‘मु.पो.कविता’ या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे सहभागी होणाऱया प्रत्येक कवीची काव्यलेखनाची, सादरीकरणाची स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली असते. वेगवेगळ्या स्वरूपाची कविता लिहिणारे अनेक ज्येष्ठ व तरुण कवी इथे जिव्हाळ्याने एकत्र येतात व आपल्या कविता ऐकवतात. इतरांच्या कविताही तितक्याच तन्मयतेने ऐकतात. मनापासून दादही देतात. या कार्यक्रमात आजवर कवी सतीश सोळांकुरकर, संजय चौधरी, प्रसाद कुलकर्णी, भगवान निळे, अन्वर मिर्झा, कवयित्री संगीता अरबुने, अनुराधा नेरुरकर, योगिनी राऊळ, छाया कोरगावकर, भाव सुधा, रेश्मा कारखानीस, गझलकार सुधीर मुळीक, प्रशांत वैद्य, गोविंद नाईक, गणेश नागवडे, सदानंद बेंद्रे, जनार्दन म्हात्रे आणि प्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर, समीर सावंत या नामवंतांनी सहभाग घेतला आहे, तर तरुण पिढीतील कवी गजानन मिटके, पंकज दळवी, प्रथमेश पाठक, जयेश पवार, गीतेश शिंदे, सचिन काकडे, विजय बेंद्रे, प्रवीण खांबल, उमेश जाधव, गुरुप्रसाद जाधव, अमोल शिंदे, केतन पटवर्धन, कवयित्री यामिनी दळवी, शिल्पा देशपांडे, पूजा भडांगे, स्वाती शुक्ल, पूजा फाटे, राधिका फराटे आणि गझलकार प्रथमेश तुंगावकर, विजय उतेकर, आकाश सावंत, शशिकांत कोळी, बंडू अंधेरे यांनी ‘मु.पो.कविता’च्या मंचावर आपल्या कविता सादर केल्या. ‘मु.पो.कविता’ या कार्यक्रमाची नेपथ्य, प्रकाश योजनेची, डिझायनिंगची, छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळणाऱया जयेश पवार, अभिजीत तर्फे, रोहन कोळी, प्रवीण लोहार, अभिजीत डोंगरे, सुधीर मुळीक, सुनील देवकुळे व बॅकस्टेज सांभाळणाऱया विशाल पाटील, सुभाष पवार, अमोल, विजय, मनोज, शिवकुमार, गंगाधर, ओमकार पालव या तरुणांचाही या कार्यक्रमाच्या यशात मोठा वाटा आहे.

‘मु.पो.कविता’ या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांना सुचली ते संजय शिंदे यांची या कार्यक्रमाच्या यशात फारच महत्त्वाची भूमिका आहे. कारण वेगवेगळ्या स्वरूपाची कविता लिहिणारे कवी शोधणं, त्यांच्या कविता ऐकणं, कवितांची निवड करणं, सादरीकरणाच्या तालमी घेणं या सर्व जबाबदाऱया ते आपल्या सहकाऱयांच्या साथीने पार पाडतात. शिवाय कार्यक्रमाच्या निवेदनाची व आयोजनाची सर्व जबाबदारी सूत्रधार म्हणून ते सांभाळतात. गेली दोन-तीन वर्षे सशक्तपणे मराठी कविता रसिकांपर्यंत पोहोचवणाऱया या कार्यक्रमाचा पंचविसावा प्रयोग नुकताच रविवार ८ जुलै रोजी प्रबोधनकार ठाकरे लघुनाटय़गृह येथे संपन्न झाला. एखाद्या कवितेच्या कार्यक्रमात पायऱयांवर बसून रसिक कविता ऐकतायत हे दुर्मीळ दृश्य यानिमित्ताने इथे पाहता आलं. कवी अशोक बागवे, अरुण म्हात्रे, संभाजी भगत, प्रमोद खराडे या ज्येष्ठ कवींनी, तर विजय आव्हाड, संकेत म्हात्रे, सुप्रिया सावंत, सुनीता रामचंद्र या नव्या पिढीतील कवींनी आपल्या कवितांनी हा मुक्काम अविस्मरणीय केला.

अरुण म्हात्रे यांनी हा कार्यक्रम म्हणजे जणू काही ‘कवितांच्या गाव जावे’ या आमच्या गाजलेल्या कार्यक्रमाची नव्याने झालेली सुरुवात आहे अशी कौतुकाची थाप दिली, तर प्रसाद कुलकर्णी यांनी ‘मु.पो.कविता’ हा कार्यक्रम मुंबईबाहेर महाराष्ट्रात, देशविदेशात पोहोचावा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. कवी संभाजी भगत यांनी या कार्यक्रमात नव्या पिढीची कविता ऐकून आपण थक्क झाल्याचे कबूल करत मराठी कवितेचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे मत मांडले. एखादा कार्यक्रम सुरू करणं फार सोपं असतं, पण त्यात सातत्य टिकवणं आणि पहिल्या प्रयोगाला ठरवलेली ध्येय व तत्त्व सांभाळत एकेक पाऊल पुढे टाकणं ही फार कठीण गोष्ट असते. ‘मु.पो.कविता’ने आजवर हे शिवधनुष्य पेलून मराठी कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा दर्जेदार प्रयत्न सातत्याने चालू ठेवला आहे. पंचविसाव्या कार्यक्रमापर्यंत मजल मारणाऱया ‘मु.पो.कविता’ या कार्यक्रमाची यशस्वी घोडदौड इथून पुढेही अशीच चालू राहावी ही शुभेच्छा!

[email protected]