काँग्रेसची चाळीस वर्षांची खिचडी बाजूला सारा – प्रा. नितीन बानगुडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोर

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीधर्मांना घेऊन ज्या मातीतून स्वराज्य घडविले, त्याच मातीत भोर प्रवेशद्वाराला शिवरायांच्या नावाला विरोध करण्याची हिंमत होतीच कशी? असा खडा सवाल करत विकासकामे न करता केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम येथील सत्ताधारी काँग्रेस करत आहे. काँग्रेसची चाळीस वर्षांची ( दिशाभूल ) शिळी खिचडी बाजूला सारून भोरच्या जनतेने खऱ्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शिवसेना उपनेते प्रा. बानगुडे-पाटील यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप शिंदे, दत्तात्रय टेमघरे, महिला संघटिका स्वाती ढमाले, छाया काळे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश मते, युवराज जेधे, केदार देशपांडे, हमीद मुलाणी, नगराध्यक्षापदाच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे, नगरसेवक उमेदवार वैशाली चोरघे, प्रियंका गायकवाड, सोनाली पवार, प्रतिक्षा शेवते व कावेरी शिंदे, केदार देशपांडे, किरण पवार, युसूफ शिकीलकर, प्रवीण दळवी, हर्षल पवार, सुशील तारू, सचिन चुनाडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिवसेनेचा असणार!
शिवसेना कधी जाहीरनामा, आश्वासननामा देत नाही, जे बोलेल तेच करून दाखविण्याची धमक फक्त शिवसेनेमध्ये आहे. भाजप, काँग्रेससारख्या जनतेला थापा मारण्याचे काम करत नसल्याने शिवसेनेने जनतेचा मोठा विश्वास कमावला आहे. यामुळे आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा असणार, असा विश्वास प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केला.