माथेरान पालिका मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कर्जत

माथेरान गिरीस्थान नगरपालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या मनमानी कारभाराला माथेरानकर वैतागले आहेत. मागील चार महिन्यात त्यांची तब्बल तीन वेळा चौकशी झाली. पण त्यानंतर त्यांच्यावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे लोकप्रतिनिधी संतापले असून १६ जुलै रोजी मुख्याधिकारी घोलप यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.

सागर घोलप यांनी २०१६ साली माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. पण तेव्हापासूनच मनमानी कारभारामुळे ते सातत्याने चर्चेत आहेत. माथेरान मध्ये वाहनांना बंदी आहे. पण असे असतानाही रुग्णवाहिकेचा ते गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. माथेरान हे दुर्गम भागात असल्याने तेथे अधिकाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहणे गरजेचे आहे. पण घोलप माथेरानमध्ये कमी दिसत असल्याचे समोर आले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ते फोन बंद करून ठेवतात, असाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा ते मानसिक छळ करतात. वेळेपेक्षा अधिक काम करुन घेतात. असाही आरोप कर्मचारी करत आहेत.

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. त्यात मुख्याधिकाऱ्यांची बदली न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने घोलप यांची तब्बल दोन वेळा चौकशी केली. मात्र त्यांच्यावर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे घोलप याच्यावर राजकिय वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे. यामुळे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत घोलप यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी १६ जुलै रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे.