सिंधुला उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ पी. व्ही. सिंधूला थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. चौथी सीडेड जपानच्या नोझोमी ओकुहरा हिने पी. व्ही. सिंधूला २१-१५, २१-१८ अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत करीत अजिंक्यपदावर नाव कोरले. त्यामुळे आता पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहरा यांच्यामधील आतापर्यंत झालेल्या लढतीत हिंदुस्थानच्या खेळाडूला सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान तिने पाच वेळा विजय मिळवलाय.

चौथी सीडेड नोझोमी ओकुहरा हिच्या झंझावाती खेळासमोर पी. व्ही. सिंधूचा निभाव लागला नाही. पहिला गेम तिने २१-१५ आणि दुसरा गेम तिने २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या सीडेड पी. व्ही. सिंधूला संपूर्ण लढतीत सूर गवसला नाही ही खेदजनक बाब. अखेर ५० मिनिटांमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या कांता सुनेयामा याने इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तो याला २१-१६, १३-२१, २१-९ असे हरवले आणि झळाळता करंडक जिंकला.