प्रेमाचे कुठले रंग आजपासून उधळणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

छोटय़ा पडद्यावर गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मालिकांमध्ये पोलिसांनी गुह्याची कशा प्रकारे उकल कशी केली यापेक्षा गुन्हा कसा घडला? हे ‘नाटय़रूपांतरा’च्या नावाखाली अतिरंजितपणा आणि नाटकी निवेदनाच्या माध्यमातून दाखवले जाते. प्रेक्षकांचे प्रबोधन करण्याऐवजी उलट अशा मालिका टीआरपीसाठी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून प्रेक्षकांची दिशाभूल करतात. नाटय़मय रूपांतराच्या नावाखाली होणारी प्रेक्षकांची फसवणूक थांबवा, असा संताप प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे.

प्रेमाची काळी बाजू दाखवण्यासाठी ‘स्टार प्रवाह’वर उद्यापासून ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका दाखल होणार आहे. यात प्रेमाची काळी बाजू उलगडण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. परंतु आपली मालिका प्रेक्षकांनी पाहावी याकरिता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रेमाची विकृती दाखवणारे प्रोमो विविध वाहिन्यांवरून दाखवले जात आहेत. यावरूनच मालिकेत नाटय़रूपांतराच्या नावाखाली वादग्रस्त कथानक दाखवून भावी पिढीसमोर चुकीचा इतिहास मांडला जाणार असल्याचे दिसतेय. त्यामुळे प्रेमाचे कुठले ‘रंग’ आजपासून उधळणार या टेन्शनमध्ये प्रेक्षकवर्ग आहे.

हे म्हणजे सिगारेटच्या पाकिटावरील वैधानिक इशाऱ्यासारखे
गुन्हेगारीवर आधारित असलेल्या तासाभराच्या मालिकेत जवळपास ४० मिनिटे नाटय़रूपांतराच्या माध्यमातून गुन्हा कसा घडला हेच अतिशयोक्ती करून दाखवले जाते. त्यानंतर शेवटच्या पाच मिनिटांत अशा गुह्यांपासून कशा प्रकारे सावध राहावे हे निवेदकाच्या माध्यमातून सांगितले जाते. हे म्हणजे सिगारेटच्या पाकिटावर लहान अक्षरांत लिहिलेल्या वैधानिक इशाऱ्यासारखेच असल्याचे प्रेक्षक सांगतात. अशा मालिकांपासून सर्वसामान्य प्रेक्षक किंवा पोलिसांना किती फायदा होतो, हा प्रश्नच आहे. परंतु अशा मालिका, सिनेमे पाहून समाजात गुन्हे घडल्याची मात्रे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा मालिकांना वेळीच आवर घातला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे.

– नाटय़रूपांतराच्या नावाखाली प्रेक्षकांची दिशाभूल का करता?
– गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या मालिकांना वेळीच आवर घाला.